लोकमत आॅन द व्हील्स : शेतकऱ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:49 PM2019-04-03T12:49:06+5:302019-04-03T12:50:47+5:30
जळगाव ते जामनेर 35 किमी
जळगाव : शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत शेतकऱ्यांसह इतर घटकांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ने सोमवारी सकाळी जळगाव-जामनेर आणि परतीच्या मार्गाने जामनेर-जळगाव दरम्यान बसमध्ये प्रवास केला. या काळात प्रवाशांशी चर्चा केली.
जामनेर विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाºया विविध स्तरावरील प्रश्नांसंदर्भात प्रवाशांशी चर्चा केली. त्यातून काही बाबी समोर आल्या.
जामनेर तालुक्यात यंदा कमी झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या वाढली आहे. सहा गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. अजूनही काही गावांना टँकरची आवश्यकता आहे. भूमिगत गटारींसाठी दोन वर्षांपासून खोदून ठेवलेले रस्ते ही जामनेर शहराची मोठी समस्या आहे. गेल्या वर्षी झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपने शहरात पक्के सिमेंटचे रस्ते करू, असे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता न झाल्याने हा लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा मुद्दा ठरू शकतो.
समस्या कायम
आतापर्यंत विविध सरकारे आली आणि गेली. परंतु समस्या मात्र कायम असल्याचे मत प्रवाशांनी प्रवासा दरम्यान व्यक्त केले.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत पात्र ठरुनही लाभ न मिळालेल्या शेतकºयांचा रोष कायम आहे. अजूनही बोंडअळी नुकसानग्रस्तांचे अनुदान खात्यावर जमा झाले नसल्याची तक्रार आहे. मत मागायला येणाºया सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना जाब विचारणार असल्याचे शेतकरी सांगतात.