लोकमत आॅन द व्हील्स : शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:11 PM2019-04-10T12:11:35+5:302019-04-10T12:12:04+5:30
जळगाव ते चाळीसगाव ९८ किमी
सचिन देव
जळगाव : दर पंचवर्षिक निवडणुकीला सर्वच पक्षांचे उमेदवार, तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देऊ, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाऊ देऊ, गावातील पाण्याचा प्रश्न सोडवु, अशा मोठ-मोठ्या घोषणा देऊन निवडुन येत असतात. मात्र, निवडुन आल्यानंतर तोंडही दाखवित नाहीत. त्यामुळे यंदा लोकसभेच्या निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांनी नुसत्या घोषणा नको करायला.. तर निवडुन आल्यानंतर रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांचे समस्या व गावातील अनेक वर्षांपासुन असलेले पाणी टंचाईचे प्रश्न सोडवावेत. अशी अपेक्षा एस. टी. महामंडळाच्या बसमधुन जळगाव-चाळीसगाव प्रवास करणाºया प्रवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकमत प्रतिनिधीने जळगाव-चाळीसगाव बसमधुन प्रवास करतांना, प्रवाशांची मते जाणुन घेतली. यावेळी पाचोरा येथील संतोष भटकर यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यामध्ये एक-दोन उद्योग वगळता, एकही मोठा उद्योग नाही. त्यामुळे शिक्षण घेतल्यानंतर येथील मुलांना रोजगारासाठी बाहेर जावे लागते. पाच वर्षांत या ठिकाणी एकही उद्योग उभा राहिला नाही. त्यामुळे आता निवडुन येणाºया कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराने युवकांसाठी रोजगार निर्मितीवर भर दिला पाहिजे. जिल्ह्यात नवीन उद्योग आणला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. भडगाव येथील सुरेश बोराडे या विद्यार्थ्याने देखील जिल्ह्यात हजारो तरुणांना नोकरी मिळेल, असा मोठा उद्योग आला पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त केली. पिंपरखेड येथील विठ्ठल गोराणे यांनी नोकरदार वर्गाला दर महिन्याला वेतन मिळत असते. मात्र, शेतकºयाचे तसे नाही. शेतात पिकले तर वर्षभर गुजारा होतो. त्यामुळे सरकारने शेतकºयांच्या समस्यांकडे लक्ष देऊन त्यांच्या मालाला हमीभाव दिला पाहिजे. तालुकास्तरावर फळ प्रक्रिया उद्योग उभारण्याची अपेक्षाही व्यक्त केली.
युवकांचा रोजगारावर भर
या बस प्रवासात अनेक युवकांनी रोजगारवरच भर दिलेला दिसुन आला. जिल्हास्तरावरच नोकरी मिळावी,अशी यंत्रणा उभारण्याची मागणी केली.
तर काही प्रवाशांनी जिल्ह्यात दर्जेदार आरोग्याच्या सुविधा मिळण्यासाठी, रुग्णालये उभारण्याची मागणी केली. तसेच वयोवृद्धांसाठी विशेष योजना राबविण्याची मागणी केली.