गाव कारभा-यांचा ‘लोकमत’तर्फे सन्मान, जळगावच्या गौरव सोहळ्यात भारावून गेले 13 सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 05:07 PM2018-01-09T17:07:48+5:302018-01-09T17:11:21+5:30
‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’चे थाटात वितरण
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 09- ग्रामविकासामध्ये भरीव योगदान देत गावगाडय़ाचा कारभार करणा-या जळगाव जिल्ह्यातील 13 सरपंचांना मंगळवार, 9 रोजी शानदार समारंभामध्ये ‘लोकमत’ सरपंच अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले. कांताई सभागृहात सुमारे साडेतीन तास चाललेला हा समारंभ म्हणजे एकप्रकारचे विचारमंथनच ठरले.
गावागावांतील विकासकामांची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभा:यांना बीकेटी टायर्स प्रस्तुत ‘लोकमत’ सरपंच अवॉर्ड्स 2017 ने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला. पतंजली आयुर्वेद हे या उपक्रमाचे प्रायोजक, तर महिंद्रा ट्रॅक्टर्स हे सहप्रायोजक होते. यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्जवला पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, ‘लोकमत’चे वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा, अॅग्रो सेल्स बीकेटी टायर्सचे सहाय्यक व्यवस्थापक जुबेर शेख, वरिष्ठ व्यवस्थापक मिलिंद सप्तकोटेश्वर, महिंद्रा ट्रॅक्टर्सचे एरिया मॅनेजर सारंग जोशी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पहिल्या वर्षी केलेल्या आवाहनाला जळगाव जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. यासाठी 108 प्रस्ताव सादर करण्यात आले होते. प्रारंभी दीपप्रज्वालन करून ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वालन करण्यात आले. त्यानंतर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कारावेळी माहितीची चित्रफीत दाखविण्यात आली. हे पाहून सरपंचांसह उपस्थित भारावून गेले. पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र देशमुख यांनी केले.
‘लोकमत’ने सन्मानित केलेले विजेते सरपंच
सरपंच ऑफ द ईयर- पुरजीत चौधरी (डांभुर्णी, ता.यावल), वीज व्यवस्थापन - चंदना पाटील (लोणपिराचे, ता.भडगाव.), शैक्षणिक सुविधा - सुदाम देवरे (लासुरे, ता.पाचोरा), स्वच्छता - पंडित माळी (बोरनार, ता.भडगाव), आरोग्य - परवीनबी शेख (गालापूर, ता.एरंडोल), पायाभूत सुविधा - आनंदा ठाकरे, (साकेगाव, ता.भुसावळ), ग्रामरक्षण - अतुल देशमुख, (तळेगाव, ता.चाळीसगाव), पर्यावरण संवर्धन - नरेंद्र पाटील, (मनवेल, ता.यावल), प्रशासन/ई-प्रशासन - अमोल भोसले (चितेगाव, ता.चाळीसगाव), रोजगार निर्मिती - मीनाबाई हटकर, (पिंपळकोठा खुर्द, ता.एरंडोल), कृषी तंत्रज्ञान - डॉ.कमलाकर पाटील (फुपणी, ता.जळगाव), जल व्यवस्थापन - विकास चौधरी (वाघळी, ता.चाळीसगाव), उदयोन्मुख नेतृत्व - कमलाकर पाटील (पाळधी, ता.जामनेर).