रामेदववाडीत मतदानावर बहिष्कार; वसंतवाडीकरही मतदानाला गेले नाहीत
By सुनील पाटील | Updated: May 13, 2024 14:04 IST2024-05-13T14:03:38+5:302024-05-13T14:04:07+5:30
गेल्या आठवड्यात ७ मे रोजी रामदेववाडी गावाजवळ भरधाव कारने दुचाकीला उडविल्याने त्यात चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण संशयितांना अटक केली नाही.

रामेदववाडीत मतदानावर बहिष्कार; वसंतवाडीकरही मतदानाला गेले नाहीत
जळगाव : गेल्या आठवड्यात रामदेववाडीनजीक झालेल्या अपघातात दोन चिमुरड्यांसह माता व भाचा अशा चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा रोष रामदेववाडी व वसंतवाडी या दोन गावातील लोकांमध्ये आजही कायम असून नागरिकांनी थेट मतदानावरच बहिष्कार टाकला. दोन्ही गावांमध्ये सकाळपासून बूथ लागले, पण एकही मतदार मतदानासाठी घरातून बाहेर पडला नाही. वडली, ता.जळगाव येथे जीवंत व्यक्तींना मतदार यादीत मयत दाखविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. ‘लोकमत’ प्रतिनिधीने ग्रामीण भागातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या असता हे प्रकार निदर्शनास आले.
गेल्या आठवड्यात ७ मे रोजी रामदेववाडी गावाजवळ भरधाव कारने दुचाकीला उडविल्याने त्यात चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण संशयितांना अटक केली नाही. मंत्र्यांनी वेळ मारुन नेली. आमच्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर रोष व्यक्त केला. आताच नाही तर पुढे विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीलाही मतदान करणार नाहीत, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. गावातील वातावरण पाहता मतदान केंद्रावर दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते.
वडलीत दोन माजी सरपंचासह चौघांना दाखविले मयत
वडली गावातील मतदार यादीत गोकुळ गजमल पाटील व सत्यभामा अशोक पाटील या माजी सरपंचांसह त्र्यंबक श्यामराव पाटील व जितेंद्र एकनाथ पाटील या चौघं जीवंत व्यक्तींना मयत दाखविण्यात आले आहे. त्याशिवाय मयत झालेल्यांची नावे कायम होती. नाव नोंदणी करुनही अनेक नवमतदारांची नावेच समाविष्ट झालेली नाही. बीलएओंनी या कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप रहिवाशांनी केला.