उमेदवारीविषयी पराकोटीची उत्कंठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:01 PM2019-02-03T12:01:42+5:302019-02-03T12:02:02+5:30
निवडणूक म्हटली की, इच्छुकांची भाऊगर्दी ही ठरलेली असते. पण इच्छुकांची वर्गवारी करायची म्हटली तर सत्तासुंदरीचे स्वप्न पडणारे भावूक, नेत्यांनी पाठीवर हात ठेवताच बाहुबळ विस्तारलेले उत्साही, डावपेच आखून बाजी पलटविणारे धुरंधर हमखास असतात.
मिलिंद कुलकर्णी
लोकसभा निवडणुकीची घोषणा महिन्यानंतर होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांची लगीनघाई सुरु आहे. राजकीय पक्षांनी सर्वेक्षणाद्वारे मतदारसंघातील स्थितीचा अंदाज कधीच घेतलेला आहे, आता इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला जात आहे. प्रत्येक मतदारसंघात एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक असल्याने पराकोटीची उत्कंठा निर्माण झाली आहे.
खान्देशातील चार मतदारसंघांपैकी धुळ्याचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. दोन दिग्गज तेथे झुंजणार आहेत. अमरीशभाई पटेल यांनी काँग्रेसतर्फे दोनदा याठिकाणी भाग्य अजमावले, परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे यंदा ते स्वत: बाजूला झाले आणि रोहिदास पाटील यांना वाट करुन दिली. काँग्रेसमधील बेकीने अनेकदा घात केल्याचा इतिहास असताना यंदा एकीवर जोर दिला जात आहे. तीन राज्यातील निकालानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असल्याने अशा सकारात्मक बाबींची त्यात भर पडत आहे. एकमेकांशी झुंजणारे ‘जवाहर’ आणि ‘अँकर’ गट एकत्र आले तर काँग्रेसची स्थिती मजबूत होऊ शकते. अमरीशभाई स्पर्धेतून बाहेर पडल्याने रोहिदास पाटील हे एकमेव प्रबळ दावेदार उरले. प्रदेश समितीने त्यांचे एकट्याचे नाव केंद्रीय समितीकडे पाठविले आहे.
भाजपातर्फे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे हेच उमेदवार असतील, असे चित्र आहे. कारण इच्छुक म्हणूनदेखील कुणाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. मुळात लोकसभेसाठी भाजपाकडे नेहमी उमेदवाराची वानवा राहिलेली आहे. नाशिकचे विधान परिषद सदस्य प्रतापराव सोनवणे यांना मालेगावचा विचार करीत संधी दिली गेली. त्यानंतर सेनेतील डॉ.भामरे यांना उमेदवारी देण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्रिपद असल्याने भामरे आणि भाजपा अशा दोघांच्यादृष्टीने ही जागा प्रतिष्ठेची झाली आहे.
भाजपापुढे दोन अडचणी आता तरी दिसत आहे. मालेगावमध्ये भाजपाला समर्थन वाढवावे लागेल तर दुसरीकडे असंतुष्ट आमदार अनिल गोटे यांच्या उपद्रवाला कसे सामोरे जायचे याची रणनीती ठरवावी लागणार आहे. धुळे महापालिकेतील सत्ता आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भक्कम साथ ही भामरे यांची जमेची बाजू राहणार आहे.
नंदुरबार आणि जळगावात चुरस निर्माण झालेली आहे. नंदुरबारात भाजपाची उमेदवारी डॉ.हिना गावीत यांना निश्चित मानली जात आहे. राष्टÑवादी वा कॉंग्रेस प्रवेशाच्या वावड्या उठल्या असल्या तरी डॉ.विजयकुमार गावीत आणि डॉ.हीना गावीत यांनी ठामपणे त्या फेटाळल्या आहेत.
काँग्रेसमध्ये परिवर्तनाचे वारे वाहत आहे. माणिकराव गावीत आणि सुरुपसिंग नाईक या काँग्रेसच्या अग्रेसर शिलेदारांनी सक्रीय राजकारणातून बाहेर व्हायचे ठरविलेले दिसते आहे. त्यामुळे लोकसभेसाठी माणिकरावांचे पूत्र भरत आणि धडगावचे आमदार अॅड.के.सी.पाडवी या दोघांच्या नावाची शिफारस केंद्रीय समितीकडे करण्यात आली आहे. माणिकरावांच्या नावाचा करिष्मा भरत गावीत यांना उपयोगी ठरतो की, आमदारकीचा दीर्घ अनुभव पाडवी यांना कामी येतो, हे बघायचे. नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी हे प्रकृतीच्या कारणास्तव बाहेरगावी असल्याने अमरीशभाई पटेल यांच्याकडे या मतदारसंघाची जबाबदारी सोपविली असल्याची माहिती समोर आली आहे. सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांना कार्याध्यक्ष नेमून पटेल यांनी निवडणुकीची सूत्रे हाती घेतल्याचे दिसते.
जळगावात भाजपा आणि राष्टÑवादी काँग्रेस अशा दोन्ही पक्षात उमेदवारीविषयी चुरस आहे. भाजपामध्ये स्वत: ए.टी.पाटील, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार स्मिता वाघ, आमदार उन्मेष पाटील, प्रकाश पाटील तर राष्टÑवादी काँग्रेसमध्ये अनिल भाईदास पाटील, प्रमोद पाटील यांची नावे चर्चेत आहेत.
रावेरविषयी उत्कंठा कायम असली तरी खासदार रक्षा खडसे यांचे तिकीट कापण्याची शक्यता अतीशय कमी आहे. एकेक जागा महत्त्वाची असताना भाजपाचे श्रेष्ठी जोखीम घेणार नाहीत, असे म्हटले जाते. राष्टÑवादीतर्फे अॅड.रवींद्र पाटील, संतोष चौधरी स्पर्धेत आहेत. डॉ.उल्हास पाटील यांच्यासाठी काँग्रेस ही जागा घेण्यास उत्सुक आहे.
धुळ्याची लढाई दोन दिग्गजांमध्ये होईल, हे निश्चित झाले आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांना भाजपाची उमेदवारी मिळेल, अशी खात्री समर्थकांना आहे. कारण पर्यायी उमेदवार पक्षाकडे नाही. त्यांच्या विरोधात काँग्रेस दिग्गज नेते रोहिदास पाटील यांना उतरविणार आहे. प्रदेश समितीने त्यांच्या एकट्याचे नाव केंद्रीय समितीकडे पाठविले आहे. नंदुरबारात अॅड.के.सी.पाडवी यांच्यासोबत माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत यांचे पूत्र भरत यांचेही नाव केंद्रीय समितीकडे पाठविले गेले आहे.
चर्चेतील छायाचित्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. जळगाव व रावेरचा आढावा त्यांनी घेतला. त्यावेळची दोन छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारीत झाली आणि गहजब उडाला. एकात फडणवीस, दानवे हे खुर्चीत बसलेले तर खडसे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल हे उभे आहेत. मात्र दुसºयात सगळे बसलेले आहेत.
.