जिल्ह्यातील बुकींची नजर मॅन्चेस्टरच्या हवामानावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:07 AM2019-06-14T11:07:53+5:302019-06-14T11:11:54+5:30
भारत-पाकच्या सामन्यासह पावसावरही कोट्यवधीचा सट्टा : संघाच्या विजयासह खेळाडूंच्या कामगिरीवरही लक्ष
अजय पाटील
जळगाव : वर्ल्ड कपमध्ये १६ जून रोजी पारंपरिक प्रतीस्पर्धी भारत-पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सामन्यावर जिल्ह्यात कोट्यवधीचा सट्टा लावण्यात आला आहे. त्यातच जिल्ह्यातील बुकींच्या नजरा थेट मॅन्चेस्टरच्या हवामानावर खिळल्या आहेत. सामन्यादरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, सामन्यादरम्यान पाऊस होईल की नाही ? यावर देखील लाखोंचा सट्टा लावण्यात आल्याची माहिती सट्टाबाजारातील सूत्रांनी दिली आहे.
भारत-पाकिस्तानच्या सामन्याबाबत जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. त्यातच गेल्या काही महिन्यांमध्ये भारत-पाकदरम्यान निर्माण झालेल्या अशांततेमुळे हा सामना अंत्यंत प्रतीष्ठेचा झाला असून, त्यातच दोन्ही संघ वर्ल्डकप सारख्या स्पर्धेत एकमेकांसमोर उभे ठाकल्याने चाहत्यांचा नजरा १६ जून रोजी होणा-या सामन्यावर खिळून बसल्या आहेत.
चाहत्यांसह सट्टा बाजारातील बुकींच्या नजरा देखील या सामन्यावर आहेत. वर्ल्डकपमधील इतर सामन्यांचा तुलनेत या सामन्यावर वर्ल्डकप सुरु होण्याआधीपासून सट्टा लावला जात असल्याची माहिती सट्टा बाजारातील सूत्रांनी दिली आहे. गुरुवारी झालेल्या भारत विरुध्द न्युझीलंड सामना देखील पावसामुळे रद्द झाला आहे. यावर सट्टा लावल्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. या सामन्यावर देखील मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात आला होता. तसेच आता किती सामने पावसामुुळे रद्द होतील व किती सामने होतील यावर देखील सट्टा लावला जात आहे.
सामन्यादरम्यान पावसाची शक्यता कमी
१६ जून रोजी मॅन्चेस्टर येथे सामना होणाºया दरम्यान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सामन्यादरम्यान पाऊस होईल की नाही ? यावर सट्टा लावण्यात आला आहे. पावसाच्या शक्यतेवर ५० पैसे तर पाऊस येणार नसल्याच्या शक्यतेवर २५ पैसे भाव देण्यात आला आहे. हवामान खात्याचा अंदाज जरी पावसाचा असला तरी सट्टा बाजाराच्या मते मॅन्चेस्टरयेथे सामन्यादरम्यान पाऊस होणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसाचा अंदाजासाठी बुकी काही आॅनलाईन हवामान संकेतस्थळाचा वापर करत आहेत. तर काही बुकी थेट अंदाजेच पावसाचा अंदाज लावत आहेत. दरम्यान, हा सामना डकवर्थ-लुईसच्या नियमानुसार होईल अशीही शक्यता बुकींकडून वर्तविली जात आहे.
सट्टा बाजाराची पसंती भारतालाच
-सट्टा बाजारात बुकींची पसंती ही भारतालाच आहे. सध्या भारतावर २५ पैसे ७५ पैसे असा भाव लावला जात आहे. तर पाकिस्तान १ ते दीड रुपयांपर्यंतचा भाव निश्चित करण्यात आला आहे.
-प्राथकिम स्वरुपावर सट्टा बाजाराची भारताला पसंती असली तरी हे चित्र सामन्यानंतर बदलत जाणार असून, सामन्याचा प्रत्येक ओव्हर, विकेट व रन्सवर देखील सट्टा लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-जय-पराजयासह खेळाडुंच्या वैयक्तिक कामगिरीवर देखील सट्टा लावण्यात आलेला आहे. मोहम्मद आमीर किती विकेट घेतो ? यासह विराट कोहली, रोहीत शर्मा यांच्या शतक व अर्धशतकांवर देखील लाखोंचा सट्टा लावण्यात आला आहे.
-नाणेफेकीवर देखील सट्टा लावला जात असून भारत नाणेफेक जिंकल्यावर ५० पैसे व पाकिस्तान नाणेफेक ंिजंकल्यावर ७५ पैसे भाव निश्चित करण्यात आला आहे.