अधिष्ठातांच्या कार्यालयाला राजवाड्याचा ‘लूक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:11 AM2020-12-27T04:11:48+5:302020-12-27T04:11:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात वैद्यकीय सेवा सुटसुटीत करण्यासह सजावट, रंगरंगोटी करून परिसराचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात वैद्यकीय सेवा सुटसुटीत करण्यासह सजावट, रंगरंगोटी करून परिसराचा कायापालट केला जात आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून काटे दाम्पत्यासह आठ ते दहा चित्रकारांनी जिल्हा रुग्णालयाला असामान्य लूक देण्यासाठी कंबर कसली आहे. यात भिंतींवर आकर्षक चित्रे तर काढण्यात आली आहेच, मात्र नव्या संकल्पनेतून अधिष्ठातांच्या कार्यालयाला राजवाड्याचे रूप देऊन हा परिसर अधिकच लक्षवेधी आणि चैतन्यमय केला जात आहे.
रुग्णांना चैतन्यमय वातावरण आणि सुशोभित परिसर दिसल्यास त्यांची रुग्णालयांकडे ओढ वाढेलच, शिवाय मानसिकतेतही बदल होऊन उपचार अधिक सोयीचे होणार आहेत, त्यामुळे नियमित स्वच्छता हा भाग आहेच; मात्र एखाद्या बगीच्याप्रमाणे सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रंगरंगोटी केली जात आहे. यात काही ठिकाणी वारली पेंटींग काढून जुन्या वास्तू अधिक देखण्या, आकर्षक बनविल्या जात आहेत. तर दर्शनी भिंतीवर विविध चित्र काढून अनेक संदेश देण्यासाठी नयनरम्य अशी कलाकृती या ठिकाणी साकारली जात आहे. झाडांवर विविध लाईट्स लावण्यात आले असून, रात्रीच्या सुमारास हा परिसर एखाद्या पर्यटनस्थळाप्रमाणे दिसत असतो. त्यात एक अत्यंत जुने मशीन दर्शनी भागात सजवून लावण्यात आल्याने परिसराचा अगदीच कायापालट झाला आहे. राज्यातील अशा प्रकारे सजविण्यात आलेले हे पहिले महाविद्यालय असल्याचे सांगितले जात आहे.
दोन महिन्यांच्या गर्भवती
प्रा. अविनाश काटे हे उडीसा येथे महाविद्यालयात प्राचार्य आहेत. कोरोनामुळे ऑनलाइन क्लासेस सुरू असल्याने मिळालेला वेळ ते या कामात घालवत आहेत. विशेष बाब म्हणजे ही सेवा ते पूर्णत: मोफत देत आहेत. विशेष बाब म्हणजे त्यांच्या पत्नी प्रा. वैशाली काटे या दोन महिन्यांच्या गर्भवती असूनही ते या कामात पूर्ण सहकार्य करीत आहेत. कोरोनाची भीती असतानाही कलाकृतीने रुग्णांना या वातावरणाचा हेवा वाटावा त्यांची मानसिकता बदलावी, यासाठी या कलाकृती साकारत असल्याचे ते सांगतात. यात त्यांची मुलगी त्यांना सहकार्य करीत आहे. यासह अश्विनी पाटील, हर्षल कदम, सत्यनारायण पवार आदी यासाठी मेहनत घेत आहेत. रुग्णालयाचे स्वच्छता निरीक्षक बापू बागलाणे यांनी या सजावटीच्या कामात पुढाकार घेतला आहे.