जळगावात उपचाराच्या धडपडीतही रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 11:54 AM2018-12-09T11:54:25+5:302018-12-09T11:57:26+5:30

खाजगी रुग्णवाहिका चालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी

Loot of patients by the ambulance driver in Jalgaon, | जळगावात उपचाराच्या धडपडीतही रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांची लूट

जळगावात उपचाराच्या धडपडीतही रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांची लूट

Next
ठळक मुद्देदीड ते दोन पट भाडेएकाच ठिकाणाहून मोठी तफावत

जळगाव : गंभीर आजार व अपघातावेळी अत्यावश्यक व तातडीच्या उपचारासाठी जळगावातून मोठ्या शहरात (हायर सेंटर) हलविण्याची वेळ रुग्णावर आली तर खाजगी रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांची सर्रासपणे मोठ्या प्रमाणात लूट केली जाते. उपचारासाठी वेळेला महत्त्व असल्याने त्याचा गैरफायदा घेत दीड ते दोन पट जादा भाडे वसूल करण्याचा गोरखधंदा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जिल्हा रुग्णालय) परिसरात मांडला असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणी दरम्यान आढळून आले.
रुग्णाची प्रकृती खालावली तर त्याला इतर शहरामध्ये हलविण्यासाठी रुग्णवाहिका चालकांकडून लूट सुरू असल्याच्या तक्रारी वाढत आहे. त्याची पडताळणी करण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात पाहणी केली असता, रुग्णवाहिका चालकांकडून मोठ्या प्रमाणात भाडे आकारण्यात येत असल्याचे आढळून आले.
दीड ते दोन पट भाडे
प्रचलित वाहतुकीनुसार एखादे वाहन एका दिवसात ३०० कि.मी.च्यावर प्रवास करीत असेल तर त्या प्रवासाचे प्रति कि.मी. नुसार भाडे घेतले जाते. रुग्णाची प्रकृती खालावल्यास बहुतांश वेळा अशा रुग्णांना जळगावातून औरंगाबादला हलविले जाते. औरंगाबादचे परतीचे अंतर ३२० कि.मी. होते. तसे पाहता सध्या आठ ते १० रुपये प्रति कि.मी. प्रमाणे लहान वाहनांचे भाडे लागते. त्यामुळे औरंगाबादचे भाडे साधारण तीन ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत होते. मात्र दीड ते दोन पट जादा भाडे वसूल केले जाते.
एकाच ठिकाणाहून मोठी तफावत
रुग्णवाहिकेतून रुग्णाला न्यायचे झाल्यास रुग्णालयाबाहेर एकाच रांगेत उभ्या असलेल्या, एकाच ठिकाणाहून निघणाऱ्या रुग्णवाहिकांच्या भाड्यात मोठी तफावत असल्याचे यावेळी दिसून आले. एका रुग्णवाहिका चालकाने औरंगाबादला जाण्यासाठी ५००० रुपये भाडे सांगितले.
थोडी तडजोड करीत अखेर तो ४८०० रुपयांमध्ये तयार झाला. त्यानंतर एका रुग्णवाहिका चालकाने ४५०० रुपये सांगितले. तर दुसºया एका रुग्णवाहिका चालकाने प्रथम ४३०० रुपये सांगितले व त्यातही २०० रुपये कमी करू असे सांगून तो ४१०० रुपयांमध्ये जाण्यास तयार झाला.
वाजवी भाडे घेणे अपेक्षित असताना कोठे ४१०० तर कोठे ४८०० रुपयांपेक्षाही जास्त भाडे घेतले जात असल्याची तफावतही येथे दिसून आली. रुग्णाच्या नातेवाईकाच्या राहणीमाननुसार पैसे सांगितले जातात, असाही अनुभव येथे आला.
एका बाजूने रिकामे यावे लागते
आपल्याकडून जादा भाडे आकारले जात असल्याची जाणीव रुग्णवाहिका चालकांना करून दिली असता, आम्हाला एकाच बाजूचे भाडे मिळते. परत येताना रिकामेच यावे लागते, त्यामुळे परवडत नाही. म्हणून एवढे भाडे आकारले जाते, असे रुग्णवाहिका चालकांचे म्हणणे होेते.
रुग्णालयात खाजगी रुग्णवाहिकांची घुसखोरी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासमोर या खाजगी रुग्णवाहिका तर लागलेल्या असतातच. शिवाय त्या रुग्णालयातील वाहनतळावरदेखील लावलेल्या असतात. या ठिकाणी रुग्णांचे नातेवाईक, अधिकारी, कर्मचारी यांची वाहने लावण्यास जागा नसताना तेथे या खाजगी रुग्णवाहिकांची घुसखोरी दिसून येते. अनेक वेळा येथे १०८ रुग्णवाहिका आल्यानंतर अडचणीदेखील येतात. येथे इतर वाहने लावल्यास ती चोरीला गेल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.
कि.मी. प्रमाणे जाण्यास नकार
३०० कि.मी.च्यावर अंतर होत असल्याने कि.मी.नुसार भाडे आकारण्याबाबत एका रुग्णवाहिका चालकास जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात विचारले असता त्यांनी सरळ नकार दिला. तुम्हाला आम्ही ठरविलेले भाडे द्यावे लागेल, कि.मी.नुसार कोणीच जाणार नाही, असे त्याने स्पष्टपणे सांगितले.
कोणीही असो, डिझेलचे पैसे तर द्यावे लागतील
खाजगी रुग्णवाहिका चालकांकडून लूट केली जात असतानाच एका मंंत्र्यांच्या नावाने सेवा म्हणून दिल्या जाणाºया रुग्णवाहिकेसाठीदेखील इंधनाचे पैसे द्यावेच लागतात. राजकीय मंडळींकडून मतदार संघातील रुग्णांच्या सेवेच्या नावाखाली रुग्णवाहिका चालविल्या जातात. यामध्ये एका मंत्र्यांच्या नावाने चालणाºया या रुग्णवाहिकेविषयी विचारणा केली असता डिझेलचे पैसे द्यावे लागतील, असे सांगण्यात आले. त्यातही व्हेंटीलेटर असलेली रुग्णवाहिका असल्यास जादा पैसे मोजावे लागतील, असे सांगण्यात आले. पुणे येथे जायचे असल्यास १२ ते १४ हजार रुपयांचे डिझेल लागेल व व्हेंटिलेटरची सुविधा असलेली रुग्णवाहिका असल्यास १७ ते १८ हजार रुपये लागतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे रुग्णसेवा व आरोग्य सेवक या बाबत केवळ गप्पा मारल्या जातात, असा अनुभव आला.
सुविधा वाढल्यास रक्कम वाढते
रुग्णवाहिका घेताना त्यात आॅक्सिजन लागल्यास त्याचे जादा पैसे लागतात. तसेच वातानुकुलीत, डॉक्टर घेतल्यास आणखी दर वाढतात. त्यामुळे खाजगी रुग्णवाहिकांच्या वर नमूद केलेल्या दरांमध्ये पुन्हा साधारण एक हजार रुपयांपर्यंत वाढ होते.
एका संस्थेकडून वाजवी दरात सेवा
प्रचलित भाड्यापेक्षा खाजगी रुग्णवाहिका चालकांकडून जादा दर आकारले जात असताना शहरातील एका सेवा भावी संस्थेकडून रुग्णसेवा म्हणून कमी दरात रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते. यात केवळ डिझेलचे पैसे घेतले जातात व तेदेखील इतर रुग्णवाहिकांपेक्षा निम्मेच आहे. पुणे व मुंबई येथे जायचे असल्यास नऊ हजार रुपये घेतले जातात. त्यातही सदर संस्थेचे सभासद असल्यास संबंधितास दोन रुपये प्रती कि.मी.ने रक्कम परत केली जाते.

Web Title: Loot of patients by the ambulance driver in Jalgaon,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.