जळगाव : आम्ही तेथून जाऊ तेव्हा लुटमार करा... मित्रानेच रचला मित्राला लुटण्याचा डाव...
By सागर दुबे | Published: March 30, 2023 06:57 PM2023-03-30T18:57:44+5:302023-03-30T18:57:52+5:30
अभिषेक निंभोरे आणि त्याचा मित्र साहिल कासार असे मंगळवारी रात्री शिरसोली रस्त्याकडे फिरण्यासाठी गेले होते.
जळगाव - शिरसोली रस्त्याकडे मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या अभिषेक जगन्नाथ निंभोरे (२४, रा. किसनराव नगर) या तरूणाला दोन तरूणांनी रस्यावर अडवून बेदम मारहाण करून मोबाईल व चांदीची चैन हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास शिरसोली रस्त्यावरील कृष्णा लॉनजवळ घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन तासात पोलिसांनी चोरट्यांचा पर्दाफाश केला आहे. तीन जणांना अटक झाली असून त्यात निंभोरे याच्यासोबत फिरण्यासाठी गेलेला साहिल विजय कासार (२३, रा.सिंधी कॉलनी) याचा सुध्दा समावेश असून त्यानेच त्याच्या दोन साक्षीदारांच्या मदतीने मित्राला लुटण्याचा डाव रचल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
अभिषेक निंभोरे आणि त्याचा मित्र साहिल कासार असे मंगळवारी रात्री शिरसोली रस्त्याकडे फिरण्यासाठी गेले होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास पुन्हा घराकडे परतत असताना कृष्णा लॉनजवळ त्यांना दोन जणांनी थांबवून मारहाण करीत अभिषेक याच्याजवळील १५ हजार रूपयांचा मोबाईल व दोन हजार रूपये किंमतीची चांदीची चैन हिसकावून नेली होती.
याप्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली होती. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासचक्र फिरविल्यानंतर साहिल लुटीचा डाव रचल्याची पोलिसांनी मिळाली. त्यांनी तत्काळ साहिल याला ताब्यात घेवून त्याची चौकशी करून त्याचे साथीदार भोला अजय सरपटे (२२, रा.नवल कॉलनी) व आतिष नरेश भाट (२३, सिंगापूर, कंजरवाडा) यांना सुध्दा ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांनी साहिल यानेच 'आम्ही त्याठिकाणाहून जाऊ तेव्हा लुटमार करा' असे सांगितले होते, अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर साहिल याने सुध्दा गुन्ह्याची कबुली दिली. तिघांना अटक करण्यात आली असून गुरूवारी न्यायालयात हजर केले असता, १ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, इम्रान सैय्यद, छगन तायडे, सचिन पाटील, योगेश बारी, साईनाथ मुंढे आदींच्या पथकाने केली आहे.