चाळीसगावला श्वानाला गुंगीचे पदार्थ देऊन फोडले घर, १२ ते १५ लाखाचा ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 01:18 PM2019-07-06T13:18:08+5:302019-07-06T13:18:34+5:30
घरांच्या कड्या बाहेरुन लावून घेतल्या
चाळीसगाव, जि. जळगाव : शिवसेना शहर प्रमुख, नगरसेवक व के.आर.कोतकर कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्यामलाल कुमावत यांच्या औरंगाबाद रोडलगतच्या प्रभात गल्लीतील राहत्या घरी चोरट्यांंनी शनिवारी पहाटे लाखोचा ऐवज लुटून नेला. कुमावत यांच्या घरासमोरील विनायक शिंपी यांचे घरही चोरट्यांनी फोडले. औरंगाबाद रस्त्यावरील रामवाडी परिसर देखील चोरट्यांनी टार्गेट केला. येथे काही घरांच्या कड्या बाहेरुन लावून एका घरातून तीन हजार रुपये रोख आणि एक मोबाईल चोरुन नेला. चोरट्यांनी गल्लीतील कुत्र्यांना गुंगीचे पदार्थ दिली असल्याची बाबही समोर आली आहे.
प्रभातगल्ली या अंत्यत गजबजलेल्या भागात चोरी झाल्याने शनिवारी सकाळी मोठी खळबळ उडाली. श्यामलाल कुमावत यांचे शेजारी - शेजारीच तीन घरे आहेत. यापैकी एका घरी चोरट्यांनी कपाटांमधील सामान आस्ताव्यस्त फेकून रोख रकमेसह सोन्या - चांदीचे दागिने असा एकुण १२ ते १५ लाखांचा ऐवज लुटून नेला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान सकाळी सर्वप्रथम कुमावत यांच्या घरासमोरील विनायक शिंपी यांच्याकडे चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर अन्य काही घरांच्या कड्या बाहेरुन लावल्याचे आढळून आले. कुत्रेही गुंगीत असल्याचे दिसून आले. थोड्या वेळात श्यामलाल कुमावत यांचेही घर चोरट्यांनी फोडल्याचे दिसले.
कुमावत यांच्या घराचे कूलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटातील त्यांच्या पत्नी, आई व मुलीचे, सोन्याचे दागिने आणि पन्नास हजाराची रोकडही लांबवली.
प्रभात गल्ली हा नेहमी वर्दळ असणारा भाग असून चोरट्यांनी येथेही हाथ की सफाई दाखविल्याने नागरिकांमधून भीतीयुक्त आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आपल्याकडे चोरी झाल्याचे लक्षात येताच श्यामलाल कुमावत यांनी तातडीने पोलिस स्टेशनला कळविले. घटनास्थळाळी शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक रोही व पोलिस पथकाने भेट देऊन पाहणी केली. सविस्तर माहिती घेऊन गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.