जळगाव येथे पाच दिवसीय भरगच्च कार्यक्रमांनी साजरा होणार भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 11:52 AM2018-03-25T11:52:14+5:302018-03-25T11:52:14+5:30
जय्यत तयारी
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २५ - शासनपती श्रमण भगवान महावीर स्वामी यांच्या २६१७व्या जन्मकल्याणक महोत्सनानिमित्त पाच दिवसीय भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महोत्सव समितीचे प्रमुख दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवानिमित्त विविध स्पर्धा होणार असून सामाजिक संदेशांचेही दर्शन या निमित्ताने होणार आहे.
भगवान महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या जन्मकल्याणक महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या संदर्भात शनिवारी दुपारी पत्रकार परिषद झाली. या वेळी दिलीप गांधी यांच्यासह खजिनदार महेंद्र जैन, ज्येष्ठ सदस्य स्वरुप लुंकड, रिकेश गांधी, प्रितेश चोरडिया, बिपीन चोरडिया, प्रवीण छाजेड उपस्थित होते.
सहपरिवार सामूहिक सामायिकने सुरुवात
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवास सहपरिवार सामूहिक सामायिकने सुरुवात होणार आहे. २५ रोजी सकाळी ७ वाजता गणपतीनगरातील रतनलाल बाफना स्वाध्याय भवनात सहपरिवार सामूहिक सामायिकचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १००८ जण सहभागी होणार आहे. महासतीजी इंदूबालाजी म.सा., महासतीजी मुदीतप्रभाजी म.स. आदी ठाणा १० यांच्या पावन सान्निध्यात हा कार्यक्रम होणार आहे.
दुचाकी रॅलीद्वारे देणार विविध संदेश
२६ रोजी दुपारी ४.३० वाजता सद्भावना दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. धर्मनाथ जैन मंदिर ते खान्देश सेंट्रल मॉल या दरम्यान काढण्यात येणाऱ्या या रॅलीद्वारे भगवंतांच्या जीवनाचा प्रचार व प्रसार करण्यासह बेटी बटाओ, रक्तदान, देहदान असे सामाजिक संदेशही दिले जाणार आहे. या सोबतच सहभागी दुचाकीस्वारांसाठी धार्मिक वेशभुषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धादेखील होणार आहे.
जीवन परिवर्तनावर व्याख्यान
२७ रोजी सकाळी नऊ वाजता पांझरापोळ संस्थान येथे गोमातेला लापसी दिली जाणार असून ९.३० वाजता बालगंधर्व नाट्यगृहात ‘मांडना’ (सजावट) स्पर्धा, भगवंतांच्या जीवनावरील भेटकार्ड (ग्रिटींग) स्पर्धा, भगवान महावीर यांची पट्टावली (भगवंतांचे भव) स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा यामध्ये व्हॉटस् अॅपवर तीन मिनिटांचे भाषण राहणार असून या सोबतच महावीराष्टक स्तोत्र स्पर्धा होणार आहे. संध्याकाळी ७.३० ते १० या वेळेत बालगंधर्व नाट्यगृहातच बंगलुरू येथील प्रसिद्ध व्याख्याता राहुल कपूर हे जीवन परिवर्तनाविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
नाटिकांद्वारे भगवंतांचा जीवन परिचय
२८ रोजी सकाळी ७.३० ते १० या वेळेत खान्देश सेंट्रल मॉल येथे ट्रेझर हंट स्पर्धा, सकाळी ९ ते १०.१५ दरम्यान बाफना स्वाध्याय भवन येथे राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गुणानुवाद नाटिका सादर केली जाणार आहे. संध्याकाळी सात ते १० या वेळेत बालगंधर्व नाट्यगृहात प्रथम तीर्थंकर भगवान आदिनाथ ते २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्यावर आधारीत नाटिका सादर केल्या जाणार आहेत. यासाठी महिला मंडळांची जोरदार तयारी सुरू असून साक्षात भगवंत अवतरल्याचा भास या निमित्ताने होणार आहे.
वरघोडा ठरणार खास आकर्षण
जन्मकल्याणक महोत्सवाचा मुख्य सोहळा २९ रोजी होणार आहे. यामध्ये सकाळी ७.३० वाजता श्री वासूपूज्य जैन मंदिर येथे ध्वजवंदन, सकाळी ८ ते ९.४५ दरम्यान श्री वासूपूज्य जैन मंदिर ते बालगंधर्व नाट्यगृहापर्यंत भव्य शोभायात्रा (वरघोडा) काढण्यात येणार असून ती खास आकर्षण ठरणार आहे. सकाळी १० ते ११.३० दरम्यान बालगंधर्व नाट्यगृहातच मंगलाचरण, स्वागत गीत भगवंताला पुष्पहार अर्पण होऊन शारीरिक, मानसिक, आरोग्यवर्धक जैन सिध्दांताच्या विश्लेषक मानसी जे. जैन (अंकलेश्वर) या जैन शास्त्राचा जीवनावर असलेला प्रभाव या विषयी मार्गदर्शन करणार आहेत. या सोहळ््याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुरेशदादा जैन हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार ईश्वरलाल जैन, शाकाहार सादाचारचे प्रणेता रतनलाल बाफना, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, संघपती दलुभाऊ जैन, माजी महापौर रमेशदादा जैन, गौतम प्रसादीचे लाभार्थी गिरधारीलाल ओसवाल, भागचंद जैन, राजेश जैन, मनोज सुराणा, समिती प्रमुख दिलीप गांधी आदी उपस्थित राहणार आहेत. देहदानाविषयी समाजात जागृती वाढावी यासाठी जैन समाजातील देहदान करणाºया व्यक्तींच्या कुटुंबीयांचा यावेळीसत्कार करण्यात येणार आहे.
या सोबतच रक्तदान, मधुमेह तपासणीदेखील होणार आहे. गौतम प्रसादी होऊन दुपारी तीन ते ५ या वेळेत श्री वासूपूज्य जैन मंदिरात पंचकल्याणक पूजा होणार आहे.
नवकार मंत्र जाप
३० रोजी आचार्य श्री रामलालजी म.सा. यांच्या जन्मोत्सवानिमित्त औद्योगिक वसाहत परिसरातील गुड्डूराजा नगर येथे ‘अर्हम’ सभागृहात नवकार मंत्र जाप होणार आहे. या सर्व कार्यक्रमांसाठी समाजातील विविध मंडळ, संघटना यांचे सहकार्य मिळत आहे.
या सोबतच विविध कार्यक्रमांचीही रेलचेल राहणार असून सहभागी होण्याचे आवाहन महोत्सव समितीच्यावतीने करण्यात आलेआहे.