भगवान महावीर जयंती : रॅलीतून दिला सद्भावनेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 01:22 PM2019-04-16T13:22:12+5:302019-04-16T13:22:59+5:30
सुरेशदादा जैन, अशोक जैन यांची उपस्थिती
जळगाव : भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीतर्फे सोमवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या सद्भावना रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधले. शिवतीर्थापासून निघालेल्या या सद्भावना रॅलीमध्ये माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, संघपती दलूभाऊ जैन यांच्यासह मोठ्या संख्येने जैन समाज बांधव सहभागी झाले होेते. भगवान महावीरांच्या नामाचा जयघोष सद्भावननेचा संदेश देण्यात आला.
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त १३ एप्रिल ते १७ एप्रिल दरम्यान सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी युवक-युवतींसाठी गणपतीनगरातील रोटरी हॉल येथे महेंद्र मुकीम यांचे प्रेरक उद्बोधन झाले. त्यानंतर सायंकाळी सद्भावना रॅली काढण्यात आली. या ठिकाणी सामूहीक नवकार मंत्राचा जप करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते ह्यजैनध्वजह्ण दाखवून सद्भावना रॅलीला सुरुवात झाली. यावेळी पारस राका, कांतीलाल कोठारी, शंकरलाल कांकरिया, नरेंद्र जैन, अजय ललवाणी उपस्थित होते. ढोल-ताशांच्या निनादात निघालेल्या रॅलीचा समारोप बालगंधर्व खुले नाट्यगृहात झाला.
बैलगाडीवर २४ तीर्थंकरांच्या प्रतिमा
या सद्भावना रॅलीमध्ये आकर्षक पद्धतीने बैलगाडीला सजविण्यात आल्या होत्या. त्यावर जैन धर्मातील २४ तीर्थंकरांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक तीर्थंकरांनी समाजासाठी सांगितलेला संदेश या प्रतिमांमधून वर्णन करण्यात आला होता. नागरिकांनी बैलगाडीमध्ये ठेवलेल्या तीर्थांकरांच्या प्रतिमा दर्शनासाठी गर्दी केली होती.
नवकार प्रतिष्ठानच्या ढोल-पथकाने रॅलीत आली रंगत
जैन बांधवांच्या तरुणांनी यंदा प्रथमच नवकार प्रतिष्ठान नावाने ढोल पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकातील ७० जणांच्या पथकाने एका तालात व सुरात ढोल वाजवून सर्वांचे लक्ष वेधले. रॅली यशस्वीतेसाठी रितेश गांधी, आयुष गांधी, सिध्दार्थ डाकलिया, परेश सिनकर,रोहित भावसार यांनी परिश्रम घेतले.