रावेरच्या रथोत्सवात भाविकांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 09:27 PM2019-12-13T21:27:42+5:302019-12-13T21:27:54+5:30
श्री दत्त आणि श्री कृष्णाचा जयघोष, रेवड्यांची उधळण
रावेर : ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’, ‘गोपालकृष्ण भगवान की जय’ अशा जयघोषात व रेवडी.. रेवडी..ची हाक देत रेवड्यांच्या उधळणीत प्रसाद झेलत रथोत्सवात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. युवकांनी मोठ्या भक्तीभावाने श्री दत्त-कृष्णरथ ओढला. शहराला १८१ वी प्रदक्षिणा रथ मिरवणुकीने भावभक्तिने शुक्रवारी पुर्ण केली.
इस्कॉन भजनी मंडळांच्या श्री राधा-कृष्ण व श्री राम-कृष्णनामाच्या सुरेल भजनांच्या तालात दत्त्त-कृष्णभक्तांनी रथोत्सवातून ओसंडून वाहणाऱ्या आत्मानंदाची अनुभूती घेतली. साक्षात श्री दत्तस्वरूप सद्गरु श्री सच्चिदानंद स्वामी महाराज यांनी उभारलेल्या प्रतिगाणगापूर स्वरूप नालाभागात उभारलेल्या श्री दत्तमंदिरातून मंगल वाद्यांच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेतून ऋषीकेष कुलकर्णी व श्रुती कुलकर्णी या दाम्पत्याने डोईवर श्री दत्तप्रभुंच्या निर्गुण पादुका तर विकास राजगुरू यांच्या डोईवर भगवान गोपालकृष्णाची मुर्ती रथापर्यंत आणल्या. तद्नंतर गणेश, भगवान गोपालकृष्णाची व श्री दत्तप्रभुंच्या निर्गुण पादुकांची रथात प्रतिष्ठापना केली. संजय मटकरी व आशिष कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले.
दरम्यान, नगराध्यक्ष दारा मोहंम्मद, तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, उपनगराध्यक्ष सादीक शेख यांचेसह नगरसेवक अॅड. सुरज चौधरी, यशवंत दलाल, सतीश अग्रवाल, जी पी अग्रवाल, श्रीराम अग्रवाल, शैलेंद्र अग्रवाल, सुधीर अग्रवाल, सुनील अग्रवाल, वाणी परिवारातील बापू वाणी, अवधूत वाणी व परंपरागत मोगरी लावण्याची सेवा बजावणारे कैलास कासार , मंगेश कासार, निलेश पाटील, भूषण कासार, दिलीप कासार, मुकेश पाटील, प्रविण पाटील, संदीप कासार, मनसुकलाल लोहार, देविदास वाणी, धनंजय वाणी, श्रीधर मानकरे, डॉ. दत्तप्रसाद दलाल, प्रतिक पाटील, राहूल महाजन आदींचा सत्कार करण्यात आला. याचप्रसंगी मुस्लिम पंचकमेटीतर्फे गयास शेख, नगरसेवक आसिफ मोहंमद, सादीक शेख, असदुल्ला खान, युसूफ खान, अॅड एम ए खान, समद शेख, अय्युबखाँ भुरेखाँ पठाण आदींनी पाचवे गादीपती श्रीपाद महाराज व मोगरीची सेवा बजावणाºया सेवेकरींचा सत्कार केला.
रथ परिक्रमेच्या मार्गात घराघरातून सुवासिनींनी भगवान गोपालकृष्ण व श्री दत्तप्रभुंच्या निर्गुण पादुकांचे औक्षण करून दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी रथावर रामचंद्र राजगुरू, विकास राजगुरू, रवींद्र सराफ व ऋषीकेश महाराज यांनी पुजेची सेवा बजावली.
रथचौकातून भोईगल्ली, महात्मा गांधी चौक, हेडगेवार चौक, मेनरोड, नालाभाग, चावडी, नागझिरी चौक, महात्मा फुले चौक, श्री स्वामी विवेकानंद चौक, पाराचा गणपती ते थेट लालबहादूर शास्त्री चौकापर्यंत रथाची परिक्रमा पूर्ण करतांना लाखो तरूणाईच्या अपुर्व उत्साहाने रात्री उशिरापर्यंत रथ मिरवणूक चालली. लाखो भाविकांची फुललेली मांदियाळी व रस्त्यावर खेळणी, मिष्टान्न भांडार व रेवड्यांच्या थाटलेल्या दुकानांनी यात्रोत्सवात एकच बहर आला होता.
पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली राज्य राखीव पोलीस दलाची, जिल्हा नियंत्रण पोलीस दलाची राखीव तुकडी व स्थानिक पोलीस बलासह होमगार्ड बंधू भगिनींचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.