कोरोनाला हरवित आहोत पण उकाड्याचे आणि असुविधांचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:17 AM2021-04-27T04:17:21+5:302021-04-27T04:17:21+5:30
कोविड सेंटरची पंख्यावर मदार : मे हिटमध्ये होणार रुग्णांचे हाल : उपाययाेजना गरजेची लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या ...
कोविड सेंटरची पंख्यावर मदार : मे हिटमध्ये होणार रुग्णांचे हाल : उपाययाेजना गरजेची
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. मात्र, दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यासुध्दा समाधानकारक आहे. आतापर्यंत १ लाख ४ हजार ९०६ लोकांनी कोरोनाला हरवून दाखविले असून, त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. दरम्यान, सध्या तापमान वाढले आहे. परिणामी, काही कोविड केअर सेंटरमधील कोरोना रुग्णांना घामाघूम होण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमान वाढत चालले आहे. अशा तापमानात कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णांची विशेष काळजी घेतली जात आहे. मात्र, काही ठिकाणी कोणीही लक्ष देत नाही, अशी तक्रार कोरोना रुग्णांची आहे. जिल्ह्यात २५ कोविड केअर सेंटर आहेत. याठिकाणी रुग्णांच्या आरोग्याची विशेष काळजी घेऊन परिसर स्वच्छ ठेवला जातो. सध्या तापमान वाढले आहे. दुपारच्या सुमारास प्रचंड उकाडा जाणवतो. उकाड्याचा रुग्णाला त्रास होऊ नये म्हणून काही ठिकाणी एसी, कुलर्स लावण्यात आले आहेत. मात्र, ज्याठिकाणी या सुविधा नाहीत, अशा ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांना उकाड्यामुळे घामाघूम होण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे दररोज हजारपेक्षा अधिक कोरोना बाधित आढळून येत असताना, बरे होणाऱ्यांचे प्रमाणसुध्दा वाढले आहे. आतापर्यंत १ लाख १७ हजार ९१६ कोरोना बाधित आढळून आले. त्यातील १ लाख ४ हजार ९०६ रुग्णांनी कोरोनाला हरवून दाखविले आहे, तर २ हजार ९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १० हजार ९११ बाधितांवर उपचार सुरू आहेत.
एप्रिल महिना तापला
- फेब्रुवारी व मार्च महिना कसा तरी रुग्णांनी कोरोना केअर सेंटरवर काढला. आता एप्रिल महिनाही तापला आहे. एप्रिल महिन्याचे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. मे महिना बाकी असून, त्यामुळे काही ठिकाणी रुग्णांसाठी सुविधा करणे गरजेचे आहे.
- १० हजार ९११ कोरोना बाधित रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यात ७ हजार ७०७ रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत, तर ३ हजार २०४ रुग्णांना गंभीर लक्षणे आढळून आली आहेत.
==================
उकाड्याचाही होतोय त्रास
सेंटरमध्ये पंखे आहेत. सध्या तापमान वाढल्यामुळे दुपारी उकाडा जाणवतो. त्याचा थोडा त्रासही होता. पण, दोन ते तीन दिवस बाकी आहेत. कुठे ओरड करीत बसणार आहे. मात्र, इतर सुविधा उत्तम मिळत आहेत.
- बाधित रूग्ण...
केंद्र शहरापासून दूर आहे. पण, प्रत्येकाची काळजी घेतली जाते. सेंटरमध्ये पंखे आहेत. थोडाफार उकाडा जाणवतो. मग, सायंकाळी आम्ही रुग्ण खोलीच्या बाहेर येऊन बसतो. आमची काही तक्रार असली तर त्याची लागलीच दखलसुध्दा घेतली जाते.
- बाधित रूग्ण...
=================
एकूण कोविड केअर सेंटर - २५
उपचार सुरू असलेले बाधित रुग्ण - १० हजार ९११