राशीच्या कपाशीची बोण्ड गळती शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 05:48 PM2020-12-10T17:48:23+5:302020-12-10T17:49:40+5:30
कापसावर पडलेल्या बोंडअळीच्या नुकसानीची जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवासी व राष्ट्रीय किसान मोर्चाचे विभागीय अध्यक्ष हिरालाल केशव पाटील या शेतकऱ्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यासह विविध अधिकाऱ्यांकडे कापसावर पडलेल्या बोंडअळीच्या नुकसानीची तक्रार केली होती. त्याअनुषंगाने जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी मंगरूळ येथे भेट देऊन शेताची परिस्थितीची पाहणी केली व याबाबत अहवाल देण्याचे कबूल केले.
शेतात बागायती राशी कंपनीच्या राशी ६५९ या जातीचे वाण ४ पिशव्या, राशी नियो या कंपनीच्या २ पिशव्या, महिको धनदेव या जातीचे २ पिशव्या व नाथ ११० या जातीच्या २ पिशव्या लागवड केली होती. पैकी नाथ ११० वगळता इतर राशी व महिको या कंपनीच्या जातीच्या वाहनांना अल्प प्रमाणात लागले. याशिवाय बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. विविध कंपन्यांचे औषधी फवारणी करूनदेखील बोंडअळी आटोक्यात येईना. अखेर मोठे नुकसान झाल्याने आपल्याला नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार अधिकारी संभाजी ठाकूर, तालुका कृषी अधिकारी भरत वारे, मंडल कृषी अधिकारी प्रदीप निकम, कृषी सहाय्यक किरण पाटील, कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण जळगाव अरुण तायडे व तेलबिया संशोधन केंद्र, जळगावचे शास्त्रज्ञ तुषार पाटील, राशी कंपनीचे विभागीय व्यवस्थापक अमोल बोरसे, क्षेत्रीय अधिकारी स्वप्नील पवार आदी उपस्थित होते.
यावेळी फाफोरे रस्त्यावरील मंगरूळ शिवारात ४१५, ४२५ गट नं मधील शेतात एका बाजूला नाथ ११० व दुसऱ्या बाजूला राशी बियाणे लागवड केली. त्यात नाथ ११० या जातीने चांगला माल निघत आहे तर राशीच्या वाणांनी उत्पादन घटले व बोंड अळी आटोक्यात आली नाही. यावेळी स्वतः जिल्हा अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी पाहणी केली. झाडांची बोंडे लागून गळती झाली, शिवाय जे लागले ते बोंड उमलले नाही. ही परिस्थिती पाहिली व दोन दिवसांत तसा अहवाल देण्याचे कबूल केले.
यावेळी राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत जगदाळे, तालुकाध्यक्ष रमेश पाटील, माजी तालुकाध्यक्ष अरुण देशमुख, तापी उपसासिंचन समितीचे अध्यक्ष दिनकर पाटील, जळगाव जिल्हा राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वास पाटील, संदीप पाटील, वि.का. सोसायटी सचिव अमोल पाटील आदी उपस्थित होते.