हरवलेलं पत्र, सावित्रीच्या लेकींना गवसलेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 01:17 PM2019-07-16T13:17:48+5:302019-07-16T13:18:20+5:30
गुरुंमुळे जडला भडगावातील कन्याशाळेच्या विद्यार्थिनींना लेखनाचा छंद
संजय हिरे
खेडगाव, ता.भडगाव : माझ्या मामाचं पत्र हरवलं.. म्हणत पहिली-दुसरीत असतांना खेळला जाणारा हा एक आबा-धोबी चा खेळ. खेळातील हे पत्र प्रत्यक्ष जीवनातुन देखील हरवत चाललेय, दोन टोकास जोडणारे संवादाचे हे प्रभावी माध्यम आजच्या इंटरनेटच्या जमान्यातही टिकवून ठेवण्यासाठी भडगावातील कन्या विद्यालयाचे एक शिक्षक सुरेश रोकडे हे आपल्या विद्याथीर्नींना पत्रलेखनाची गोडी लावत हा अमुल्य ठेवा भावी पिढीला सोपवत आहेत.
पत्रलेखन हा एकेकाळी सुख,दु:खे वाटुन घेणारा वाट पहावयास लावणारा सर्वसामांन्याचा जिव्हाळ्याचा विषय.अब्राहम लिंकनचे शाळेच्या मुख्याध्यापकास पत्र असो की राष्ट्रपिता महात्मा गांधी, सानेगुरुजी, सावरकर आदी महापुरुषांनी कारागृहातुन लिहलेली पत्रे आजही मन चेतवतात, आज व्हॉट्सअॅप आदी समाजमाध्यमांमुळे पत्रव्यवहारच दुर्मीळ होत चाललाय. अशा स्थितीत भावना मांडताना विचार अभिव्यक्तीला चालना मिळावी, अक्षर सुधारावे, एखाद्या विषयावर आपण बोलु शकत नाही पण लिहु शकतो, हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याची तळमळ शिक्षक सुरेश रोकडे यांची यामागे आहे.
मागील काही वर्षापासून कन्या शाळेतील या मुलींनी रोकडे सरांच्या मार्गदर्शनाखाली शालेय पाठ्यपुस्तकातील कविता, पाठ लेखन करणाऱ्या लेखकांना पत्र लिहून त्या-त्या कार्यक्षेत्रात त्यांचे कामाविषयी गौरवोद्गार व शुभेच्छा दिल्यात. मान्यवरांनी दिलेल्या उत्तरादाखलच्या पत्रांमुळे या मुलींचा आनंद गगनात मावेनासा होतो.
‘लोकमत’ च्या वृत्ताला सलाम... :
वेदनांच्या अंथाग आर्णवात सरस्वतीचा खळखळाट. या लोकमत मधील हद्यस्पर्शी वृत्ताने भारावुन जात शिक्षक सुरेश रोकडे यांच्यासह या कन्या शाळेतील मुलींनी आर्णव व त्याची आई शितल यांच्या जिद्दीला अभिवादन व लोकमत च्या लेखणीला सलाम करणारी भावना मांडत वृत्तासमच हद्यस्पर्शी पत्रे लिहून शुभेच्छा दिल्यात.