हरवली का तुमच्या कुलुपाची चावी; जळगावकर देतात दररोज भलत्याच समस्येला तोंड

By अमित महाबळ | Published: April 10, 2023 04:10 PM2023-04-10T16:10:18+5:302023-04-10T16:10:26+5:30

जळगावमध्ये डुप्लिकेट चावी बनवून देणारे पहिले दुकान ५० वर्षांपूर्वी सुरू झाल्याचे सांगितले जाते.

Lost your lock key; Jalgaonkar faces a lot of problems every day | हरवली का तुमच्या कुलुपाची चावी; जळगावकर देतात दररोज भलत्याच समस्येला तोंड

हरवली का तुमच्या कुलुपाची चावी; जळगावकर देतात दररोज भलत्याच समस्येला तोंड

googlenewsNext

जळगाव : धांदरटपणा, विसरभोळेपणा याची जरादेखील कमी नाही. यातूनच कुलुपाची चावी हरविण्याचे अनेक प्रकार दररोज जळगावमध्ये घडत आहेत. यामुळेच तर डुप्लिकेट चावी बनवून देणाऱ्यांचा व्यवसाय तेजीत आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात अशी सात दुकाने आहेत आणि या प्रत्येकाकडे दररोज किमान १५ ते २० ग्राहक हे चावी विसरून आलेले असतात.

जळगावमध्ये डुप्लिकेट चावी बनवून देणारे पहिले दुकान ५० वर्षांपूर्वी सुरू झाल्याचे सांगितले जाते. लुकमान शेख यांचा मूळ व्यवसाय होता छत्र्या दुरुस्त करून देण्याचा. नंतर त्यांनी कुलुपांची डुप्लिकेट चावी बनवून देणे सुरू केले. आता त्यांचा मुलगा इम्रान शेख दुकान सांभाळतो. पूर्वी कानसने घासून चावी तयार केले जाई. आता मशीनवर देखील काम होते. सामान्य घरातील व्यक्ती जसा येतो, तसा चारचाकीवालाही चावी हरविल्यावर दुकान शोधत येतो. दिवसाला ३० चाव्या बनवून दिल्या जातात. त्यापैकी १५ ते २० ग्राहक हे चावी विसरलेले असतात, असे सादिक शेख यांनी सांगितले.

आता तिसरी पिढी...

जावेद व सादिक यांचे वडील शफीर शेख आणि आजोबा वजीर पहलवान याच व्यवसायात होते. हे सगळे जळगावकर आहेत. वजीर पहलवान कुस्तीचा आखाडादेखील गाजवायचे.

अशी बनते चावी!

चावी कुलुपात फिरवून तिच्यावर खुणा घेतल्या जातात. त्या कानसने घासून योग्य चावी बनवली जाते. काही कुलुपांवरील पितळी कव्हर काढून मगच चावी बनू शकते, या पद्धतीने त्यांची घडण केलेली असते. चावी बनविण्यासाठी ओळखीचा पुरावा घेतला जातो.

चावी बनली नाही, असे झालेच नाही...

एखाद्या कुलुपाची चावी बनली नाही, असे आजपर्यंत कधी झालेले नाही. ‘नजर, कानस आणि दिमाग’ या व्यवसायात हवे. ५ ते १० मिनिटांत चावी तयार होते, लोखंड व पितळ या धातू प्रकारात त्या असतात. ७ ते १० लिव्हरपर्यंतची कुलुपे मिळतात, अशी माहिती जावेद शेख यांनी दिली. सेन्सर लॉक लोक बसवतात; पण त्यांच्या चावी बनत नाहीत, असे इम्रान शेख यांनी सांगितले.

असेही प्रसंग..

१) तीन वर्षांपूर्वी एमआयडीसीमधून एकजण धावतपळतच दुकानात आला होता. त्याच्या शेजारी राहणारी महिला स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि नेमका दरवाजा लॉक झाला. आतमध्ये गॅसवर डाळ शिजत होती, तेथेच लहान मुलगाही खेळत होता. पुश बटनचे लॉक होते. प्रयत्न करूनही दरवाजा उघडेना. माउली घाबरली. त्यांच्याकडे जाऊन कुलूप तोडावे लागले होते, अशी आठवण इम्रान शेख यांनी सांगितली.

२) निमखेडी भागात एका घराच्या खोलीत मुलगा अडकला होता आणि किल्लीही आतच राहिली होती. एका ठिकाणी आत गॅस सुरू होता आणि दरवाजा लॉक झाला होता. अशा प्रसंगात तातडीने जाऊन चावी बनवून दिली होती, अशी माहिती जावेद शेख यांनी दिली.

Web Title: Lost your lock key; Jalgaonkar faces a lot of problems every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव