आव्हाने खूप, ते पेलतील नवीन सीईओ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:12 AM2021-07-09T04:12:08+5:302021-07-09T04:12:08+5:30
नवीन आलेल्या अधिकाऱ्यांचे पहिले पाऊल काय? यावर त्यांची पुढील वाटचाल कशी राहणार, असा कयास अनेक जण अनुभवातून लावतात. जिल्हा ...
नवीन आलेल्या अधिकाऱ्यांचे पहिले पाऊल काय? यावर त्यांची पुढील वाटचाल कशी राहणार, असा कयास अनेक जण अनुभवातून लावतात. जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सोमवारी पदभार घेतला. त्यांनी प्रत्येक विभागाचा स्वतंत्र आढावाही घेतला, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली. तातडीने जिल्हा परिषदेची सद्य:स्थिती त्यांनी जाणून घेतली. विकासात्मक दृष्टिकोण ठेवून त्याची अंमलबजावणी करताना आहे त्यात अधिक चांगले काम करणे किंवा नवीन संकल्पना राबविणे या दोन बाबी महत्त्वाच्या ठरतात, डॉ. आशिया यातील नेमके कशाला प्राधान्य देणार? हे समजेलच. मात्र, आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण, योजनांची प्रभावी अंमलबजावणी अशी काही आव्हाने ते लिलया पेलतील, असे संकेत आता तरी मिळत आहेत.
जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ डॉ. बी. एन. पाटील यांच्या कारकीर्दीत काही पुरस्कार जिल्हा परिषदेला मिळाले, काही योजनांमध्ये जिल्हा उत्कृष्ट राहिला. मात्र, काही त्रुटी कायम आहेत. यात कामांना होणारा विलंब, मनुष्यबळ कमतरता, अनेक महत्त्वांच्या पदांवर अधिकारी नसणे, अनेक पदांवर वर्षानुवर्षे प्रभारी अधिकारी असणे, असे काही मुद्दे हे निकाली निघालेले नाहीत, आरोग्य विभागातील कर्मचारी कमतरतेचा तसेच पदोन्नत्यांचा विषय चार वर्षे होऊनही मार्गी लागलेला नाही. जिल्हा परिषदेला उत्पन्न मिळवून देणाऱ्या काही संकल्पना राबविल्या गेल्या नाहीत. जिल्हा परिषदेची मोठी आर्थिक बचत करू शकणारा छापखाना हा विषय केवळ सभांपुरताच मर्यादित राहिला. ही काही आव्हाने आता डॉ. आशिया यांच्यासमोर असतील, त्यातच सहा ते आठ महिन्यांनी निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यात राजकीय गर्दी जिल्हा परिषदेत वाढणार आहे. त्याचा एक दबाव प्रशासकीय यंत्रणेवर येईलच. सीईओ डॉ. पंकज आशिया हे स्वत: एमबीबीएस आहेत. त्यांनी मालेगाव येथे उत्तम काम केले आहे. भिवंडी महापालिकेतही आयुक्त म्हणून त्यांनी छाप पाडली आहे. जिल्ह्यात कोविडमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणात त्यांचा मोठा हातभार लागेल, असे एकंदरीत चित्र सध्यातरी दिसतेय. त्यांनी नुकतीच जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन लसीकरणासह अन्य सर्व लसीकरण तसेच राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची माहिती घेतली आहे. यातून आरोग्यावर त्यांचे अधिक लक्ष असेल असे स्पष्ट होतेय. २०१६ बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. पंकज आशिया मिनी मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण यंत्रणेत बिग डेव्हलपमेंट करतील, अशी अपेक्षा आहे.