गव्हाचा भरपूर साठा, मात्र ज्वारीची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 09:39 PM2019-11-27T21:39:10+5:302019-11-27T21:39:19+5:30
अतिपावसाचा परिणाम : शासकीय गोदामांमध्ये गहू, तांदूळ पुरेसा उपलब्ध
जळगाव : आॅक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने यंदा धान्य, कडधान्याची सर्वांनाच चिंता आहे, असे असले तरी शासकीय गोदामांमध्ये पुरेसा गहू, तांदूळ उपलब्ध असल्याने त्याची चिंता नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ज्वारी काळी पडल्याने ती खरेदी केली जाणार नसल्याने ज्वारीची चणचण भासणार असल्याचे संकेत दिले जात आहे.
आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे कापूस, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात एकट्या जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात ७ लाख ३ हजार ७८७ हेक्टरवर नुकसान झाले आहे. राज्यभरातही असे सर्वत्र मोठ्या प्रमाणात नुकसानीचे चित्र आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला असून उत्पादन खर्चही कसा निघेल, या चिंतेत तो आहे. बळीराजासोबतच नोकरदार, व्यावसायिक सर्वांनाच महागाई भडकण्याची चिंता आहे. यात मुख्यत्वे करून धान्याची व कडधान्याची चिंता आहे. त्यामुळे त्यांचे भाव वाढण्यासह धान्याची उपलब्धता कशी असेल, याचा सर्वच विचार करीत आहे. या पार्श्वभूमीवर धान्य साठ्याचा आढावा घेतला तर यामध्ये भारतीय अन्न महामंडळाकडून सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी पुरेसा पुरवठा केला जात असल्याचे चित्र आहे.
साठ्याची चिंता नाही
भारतीय अन्न महामंडळाच्या मनमाड येथील केंद्रावरून जळगाव जिल्ह्याला सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी धान्याचा पुरवठा केला जातो. यामध्ये सदर केंद्रावर पुरेसा गहू व तांदळाचा साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. भारतीय अन्न महामंडळाकडे देशभरातून धान्याचा साठा येत असतो. त्यामुळे मध्यप्रदेश, राजस्थान व इतर ठिकाणाहून आलेला गेल्या वर्षाचा गव्हाचा साठा असल्याची माहिती मिळाली.
दरमहा एक लाख क्विंटल गहू तर ५५ हजार क्विंटल तांदळाची आवश्यकता
जळगाव जिल्ह्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने डिसेंबर महिन्यासाठी एकूण ९९ हजार ६५९ क्विंटल गव्हाची तर ५४ हजार २३७ हजार क्विंटल तांदळाची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार हे नियतन उपलब्ध होणार असून दरमहा सरासरी एवढाच साठा जिल्ह्यासाठी आवश्यक असतो. त्यानुसार सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ हा साठा भारतीय अन्न महामंडळाकडून उपलब्ध होऊ शकणार आहे. यात विशेष म्हणजे रब्बी हंगामात गव्हाची अद्याप लागवड होणे बाकी असून रब्बीचे क्षेत्र वाढणार असल्याने यंदाही गहू मोठ्या प्रमाणात येऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.