महादेव बर्डी येथे तलावात शेकडो वर्षांपासून फुलताहेत कमळाची फुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 10:24 PM2020-11-02T22:24:49+5:302020-11-02T22:24:55+5:30
निंभोरा गावअंतर्गत दिड किमी अंतरावर ही महादेव बर्डी वस्ती आहे. या वस्तीजवळ असलेल्या तलावात शेकडो वर्षांपासून रंगीबेरंगी कमळाची फुले फुलतात. ग्रामपंचायतीमार्फत या तलावाचे दरवर्षी खोदकाम करण्यात येते. हा तलाव फुलांनी आकर्षक बनला आहे. -दिलीप पाटील, सरपंच, निंभोरा, ता. भडगाव
भडगाव : निंभोरा गाव अंतर्गत २ ते ३ किमी अंतरावर महादेव बर्डी वस्ती आहे. येथे प्राचीन महादेवाच्या देवस्थानासमोरील पाण्याच्या साचलेल्या तलावात शेकडो वर्षांपासून सफेद, पिवळी, लाल आदी विविध रंगांची कमळांची फुले नैसर्गिकरित्या बहरताना दिसत आहे.
निंभोरा गाव अंतर्गत गावापासून दीड किमी जवळपास अंतरावर महादेव बर्डीची वस्ती आहे. ही वस्ती उजवा कालव्यालगत वसलेली आहे. परिसरात संपूर्ण बरड भाग आहे. या वस्तीशेजारीच उंचावर श्री महादेवाचे प्राचीन जागृत देवस्थान आहे. या मंदिरासमोर उजवा कालव्याला लागून २५ ते ३० गुंठे जागेत पाण्याचा तलाव आहे. या तलावात नैसर्गिकरीत्या शेकडो वर्षांपासून कमळाच्या फुलांची बाग बहरत आहे. सफेद, पिवळे, लाल आदी विविधरंगी कमळाची आकर्षक फुले रोज फुलत असल्याने साऱ्यांचे आकर्षण बनले आहे. ग्रामपंचायमार्फत या तलावाचा गाळ काढून जेसीबी मशीनने खोलीकरणाचे कामही केले जाते. शेतकरीही उन्हाळ्यात पाणी आटलेल्या जागेतून शेतात टाकण्यासाठी गाळ वाहून नेतात. या वस्तीसाठी निंभोरा गावाच्या गिरणा नदीच्या पात्रातून पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईनही आली आहे.
वस्तीलाही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. बाजूला मोठा हौद बांधला आहे. पाण्याने हा हौद भरला जातो. पाणी वापरासाठी वा जनावरांना पिण्याचे पाणी म्हणून वापर होतो. या तलावातही पाणी सोडले जाते. या तलावात बाराही महिने पाणी साचल्याने कमळांच्या विविधरंगी फुलांसह हिरवळीच्या झाडाझुडपांनी तलाव सजल्याचे आकर्षक चित्र दिसून येते. या तलावातील कमळाची फुले श्री महादेवाच्या मूर्तीवर वाहिली जातात. या तलावाजवळ परिसरात वावरणाऱ्या हरिणांचे कळपही रात्रीच्यावेळी पाण्याची तहान भागविण्यासाठी नित्याने येतात.