२० शाळांमध्ये आढळले निकृष्ट दर्जाचे धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:02 PM2019-07-26T12:02:15+5:302019-07-26T12:02:44+5:30
‘त्या’ विषबाधेच्या घटनेप्रकरणी जि. प. सीईओंकडे अहवाल सादर
जळगाव : जिल्हा परिषदेच्या कन्हाळे येथील शाळेमध्ये ९ विद्यार्थ्यांना भोजनातून झालेल्या विषबाधा प्रकरणी, नेमलेल्या चौकशी समितीने गुरुवारी आपला अहवाल जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. यामध्ये भुसावळ तालुक्यातील ४२ शाळांपैकी २० शाळांमध्ये निकृष्ठ दर्जाचे धान्य आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
२२ जुलै रोजी भुसावळ तालुक्यातील कन्हाळे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर नऊ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी सावकारे यांनी कन्हाळे शाळेत जाऊन, तेथील शालेय पोषण अहाराची तपासणी केली होती. यावेळी त्यांना शालेय पोषण आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचे व तांदूळामध्ये अळ््या असल्याचे आढळून आले होते. यानंतर त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांच्याकडे निकृष्ट पोषण आहारातील धान्याचे नमुने आणून, ठेकेदार आणि पोषण आहार अधीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
तसेच शिक्षण समितीच्या बैठकीत सुद्धा पल्लवी सावकारे यांनी निकृष्ट पोषण आहाराची तक्रार केल्यावर, शिक्षण सभापती पोपट भोळे तातडीने नेमून चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार नेमलेल्या चौकशी समितीतील अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व ४२ शाळामधील धान्याची तपासणी केली.
४२ शाळांपैकी २० शाळांमध्ये आढळले निकृष्ठ दर्जाचे धान्य
शिक्षण सभापतींनी नेमलेल्या चौकशी समितीतील अधिकाºयांनी भुसावळ तालुक्यातील सर्व शाळांमधील धान्यांची तपासणी करुन, धान्याचे नमुने घेतले. या नमुन्याचा अहवाल गुरुवारी या समितीच्या सदस्यांनी संजय मस्कर यांच्याकडे सोपविला आहे. यामध्ये ४२ शाळांपैकी २० शाळांमध्ये निकृष्ठ दर्जाचे धान्य आढळून आले आहे. या प्रकरणी आता पल्लवी सावकारे यांनी केलेल्या तक्रारीनुसार कुणावर कारवाई करतात. याकडे लक्ष लागून आहे.