जेईई परीक्षेत कमी गुण, विद्यार्थ्याने संपवले जीवन

By विजय.सैतवाल | Published: February 14, 2024 07:32 PM2024-02-14T19:32:00+5:302024-02-14T19:32:34+5:30

राहत्या घरात घेतला गळफास : सकाळी आईला दिसला मृतदेह

low score in jee exam student ends life | जेईई परीक्षेत कमी गुण, विद्यार्थ्याने संपवले जीवन

जेईई परीक्षेत कमी गुण, विद्यार्थ्याने संपवले जीवन

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : जेईई परीक्षेत कमी गुण मिळाल्याने निराश झालेल्या यश गणेश खर्चे (१८, रा. जोशीवाडा, मेहरूण) या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवार, १४ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जोशीवाडा परिसरात आई-वडिलांसह राहणारा यश खर्चे हा मेहरूणमधील राज विद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता. मंगळवार, १३ फेब्रुवारी रोजी जेईई परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत यशला कमी गुण मिळाले. त्यामुळे तो काहीसा निराश झाला होता. त्यातून त्याने हे पाऊल उचलल्याचे त्याचे मामा महेंद्र सोनवणे यांनी सांगितले.

मंगळवारी रात्री कुटुंबीयांसह त्याने जेवण केले. त्यानंतर तो वरच्या मजल्यावर गेला. बुधवारी सकाळी त्याची आई त्याला उठवण्यासाठी गेली. बराच वेळ आवाज दिला तरी आतून प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी घरात मुलगा गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आला. त्यामुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला.

यशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीय, नातेवाइकांनी आक्रोश केला. एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यश खर्चे हा इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता. मंगळवारी जेईई परीक्षेचा निकाल लागला. त्यात त्याला कमी गुण मिळाल्याने त्याने गळफास घेतला. बुधवारी सकाळी ही घटना लक्षात आली. - महेंद्र सोनवणे, मृत विद्यार्थ्याचे मामा

Web Title: low score in jee exam student ends life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.