खेळ नशिबाचा.... जि.प.च्या गोंधळात भाजपच्या अधिकृत उमेदवारांचा ‘गेम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 12:09 PM2020-01-07T12:09:16+5:302020-01-07T12:10:37+5:30
जल्लोष करावा की दु:ख ? पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम; बंडखोरांनी पक्षाला तारले
जळगाव : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीची पदे कोणाला द्यावी, यासाठी कोअर कमिटीची उशिरापर्यंत चाललेली खलबते ही संभाव्य उमेदवारांसाठी धोकादायक ठरली़ शेवटच्या क्षणी उमेदवार ठरले तीन जणांनी एकाच विषय समितीसाठी अर्ज दाखल केले आणि इथेच भाजपचा घात झाला. अत्यंत अनपेक्षित अशा घडामोडीमुळे ही निवड अध्यक्षनिवडीपेक्षाही लक्षवेधी ठरली़ सभापतीपदे राखूनही ठरलेले उमेदवारांची निवड न झाल्याने नेमका जल्लोष करावा की, दु:ख व्यक्त करावे, असा संभ्रम भाजपपुढे पडला.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, महिला व बालविकास, कृषी पशूसंवर्धन, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, बांधकाम, अर्थ अशा समित्यांसाठी सभापती निवड प्रक्रिया सोमवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली़ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी तर सहाय्यक म्हणून डे्प्यूटी सीईओ के़ बी़ रणदिवे होते.
महाविकास आघाडीकडूनही पवन सोनवणे व रवींद्र नाना पाटील यांनीही अर्ज दाखल केले होते, मात्र, त्यांनीही माघार घेतली़ महाविकास आघाडीेचे २९ सदस्यच होते़ सरला कोळी यांना सोमवारी मतदानाचा अधिकार नव्हता शिवाय धनूबाई आंबटकर या सदस्या अनुपस्थित होत्या़ त्यामुळे महाविकास आघाडी आधीच अल्पमतात होती़ भाजपच्या अध्यक्षनिवडीच्या वेळी अनुपस्थित सदस्या नंदा सपकाळे या आज उपस्थित होत्या शिवाय काँग्रसचे दिलीप पाटील व राष्ट्रवादीच्या मीना पाटील यांनी भाजपला साथ दिली यामुळे त्यांचे संख्याबळ हे ३५ झाले होते़ त्यामुळे निवडणूक उत्सुकतेची चिन्हे नव्हती मात्र, भाजपकडून झालेल्या बंडखोरीमुळे उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते़ गेल्यावेळी प्रमाणे भाजपचे सदस्य खाजगी बसमधून आले होते़
तर झाला असता आघाडीचा विजय
विषय समिती दोनमध्ये भाजपकडून उज्ज्वला म्हाळके व गजेंद्र सोनवणे यांनी अर्ज दाखल केले होते़ मात्र, यादोघांचीही नावे यादीत नव्हती त्यांनी बंडखोरी करीत अर्ज दाखल केले होते़ जर त्यांनी अर्ज दाखल केले नसते तर विषय क्रमांक २ मध्ये भाजपच्या एकाही उमेदवाराचा अर्ज राहिला नसता व महाविकास आघाडीच्या डॉ़ निलम पाटील यांची बिनविरोध निवड झाली असती. यात अमित देशमुख, मधुकर काटे, रवींद्र पाटील यांनी तिघांनी चुकून विषय समिती एकमध्येच अर्ज भरल्याने हे सर्व नाट्य घडले यात मात्र उज्ज्वला म्हाळके यांना पदाची लॉटरी लागल्याचे बोलले जात आहे़
जळगाव लोकसभा मतदारसंघाची एका पदावर बोळवण
गेल्या वेळी जळगाव अध्यक्षांसह दोन सभापती मिळालेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपकडून केवळ उपाध्यक्षपद देण्यात आले आहे़
तर अध्यक्षांसह चार सभापती अशी पाच पदे रावेर लोकसभा मतदारसंघात गेलेली आहेत़ यात विशेष म्हणजे तीन सभापतीपदे ही एकमेव चोपडा विधानसभा मतदारसंघात गेलेले आहे़ जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडल्याचे सांगितले जात आहे़
गेल्यावेळी जळगाव लोकसभा मतदारसंघातून अध्यक्षा उज्ज्वला पाटील, शिक्षण सभापती पोपट भोळे, समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांच्याकडे पदे होती तर रावेर लोकसभा मतदारसंघात उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, महिला व बालकल्याण समिती सभापती रजनी चव्हाण, आरोग्य सभापती दिलीप पाटील यांच्याकडे होती़ तेव्हा समान वाटप झाले होते़ यंदा मात्र, पदे वाटप करताना अध्यक्षपदासह तीन सभापती रावेर मतदारसंघात असतील अशी घोषणा एकनाथराव खडसे यांनी केली होती़ मात्र, प्रत्यक्ष निवडीत उपाध्यक्षपद सोडून सर्व पदे ही रावेर लोकसभा मतदारसंघात गेल्याने जळगाव मतदारसंघात नाराजीचा सूर पाहावयास मिळत आहे़
रवींद्र पाटील आक्रमक
पद न मिळाल्याने साकळी- दहिगाव गटाचे सदस्य रवींद्र सूर्यभान पाटील यांनी सुरुवातीला संताप व्यक्त केला़ आम्ही पक्षाचे निष्ठावान आहोत, आम्हाला दोन- दोन कोटींच्या विरोधकांकडून आॅफर आल्या मात्र आम्ही त्या झुगारत पक्षाकडून राहिलो, या शब्दात त्यांनी संताप व्यक्त करीत अर्ज दाखल केला़ त्यांच्यासह गजेंद्र सोनवणे व उज्ज्वला माळके यांनीही अर्ज दाखल केले़ या तिघांची मनधरणी करण्यासाठी माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन व उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी पुढाकार घेतला मात्र, रवंीद्र पाटील हे संतापात बाहेर निघून गेले़ यामुळे जिल्हा परिषदेच्या आवारात गोंधळ व धावपळ उडाली होती़ रवींद्र पाटील हे चारचाकीत बसत असताना त्यांना अडविण्यासाठी काही पदाधिकारी गेले मात्र, त्यांनी त्यांचे हात झकटून ते मार्गस्थ झाले. त्यानंतर माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरुन मधुकर काटे यांनी माघार घेतली़
पदे वाटपात पक्षाची अक्षम्य चूक: मधू काटे
रावेर लोकसभा मतदारसंघाकडे चार पदे व जळगाव लोकसभा मतदारसंघात दोन पदे ही निवड करताना पक्षाकडून चूक झाली़ ज्या मतदारसंघात सदस्य जास्त तिकडे अधिक पदे असे कुठेली ठरलेले नाही, शिवाय आमच्याकडे नेते व आमदार नसताना आम्ही डोंगरासारख्या शिवसेनेविरोधात लढून जिंकलो म्हणून या भागात अधिक पदे मिळणे अपेक्षित होते़ पक्षाने ऐनवेळी सांगितले व आपण पक्षादेश मान्य करून माघार घेतली़ पक्षावर कुठलीही नाराजी नाही, मात्र, पक्षाने निष्ठावानावर अन्याय केला आहे़ बाहेर आलेल्यांना झुकते माप मिळाले व जे पक्षासाठी झटलेले आहेत त्यांच्यावर अन्याय झाला आहे़ आगामी काळात आता ज्यांच्यासाठी आपण निवडू आलो आहोत त्यांचे प्रश्न अधिक ताकदीने सभागृहा मांडणार आहे़
चूक लक्षात येताच भाजपमध्ये सन्नाटा़़़
अमित देशमुख, मधुकर काटे व रवींद्र पाटील यांनी एकाच विषय समितीसाठी अर्ज दाखल केल्याची चुक सभागृहात लक्षात आल्यानंतर भाजपच्या गोटात शांतता पसरली होती़ मधु काटे यांनी माघार घेतल्यामुळे अमित देशमुख व रवींद्र पाटील यांच्यापेकी एकाला माघार घेणे क्रमप्राप्त होते, मात्र, दोघेही ठाम असल्याने फोनाफोनी सुरू झाली अखेर गिरीश महाजन यांनी देशमुख यांना माघार घेण्यास सांगितले.
आजी-माजी उपाध्यक्षांची धावपळ
अजिंठा विश्रामगृहात सकाळी अकरा ते साडेबारा वाजेपर्यंत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली़ नावे अंतिम झाल्यानंतर नंदकिशोर महाजन व उपाध्यक्ष लालचंद पाटील यांना नेत्यांनी या ठिकाणीच अर्ज घेऊन बोलावले़ ते आल्यानंतर नावे अंतिम करून एक वाजेची वेळ असल्याने या ठिकाणाहून दोघेही अगदीच धावत पळत अर्ज भरण्यासाठी निघाले़ ऐन वेळेची ही धावपळ अमित देशमुख यांच्यासाठी धोकादायक ठरल्याचे बोलले जात आहे़ या गोंधळातच कोणी कोणत्या समितीसाठी अर्ज भरला यावर चर्चाच झाली व सभागृहात हा सर्व घोळ समोर आला़
नावांवर कोअर कमिटीचे एकमत नव्हते?
सभापती निवडीसाठी अजिंठा विश्रामगृहात सकाळी अकरा वाजेपासून बैठक झाली़ यात एकनाथराव खडसे, आमदार गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष डॉ़ संजिव पाटील आदींसह कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते़ चारही नावे एकनाथराव खडसे यांनी जाहीर केली मात्र, काही नावांवर महाजन व खडसे यांचे एकमत होत नव्हते़ असे वृत्त आहे़ अखेर एकनाथराव खडसे यांनी दिलेली नावे अंतिम करण्यात आली़ मात्र, यात पल्लवी सावकारे यांचे नाव नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली व त्यांचे त्यांचे पती प्रमोद सावकारे यांनी अजिंठा विश्रामगृहात आमदार संजय सावकारे यांच्या सोबत गिरीश महाजन यांच्याशी पंधरा ते वीस मिनिटे चर्चा करून नाराजी व्यक्त केली़ दरम्यान, ज्यांच्या पाठीशी कायम उभे राहिलो त्यांनीच विरोध केला ही बाब धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया पल्लवी सावकारे यांनी दिली आहे़
घरातले भांडण होते, पक्षाने अर्थात आई-वडिलांनी मुलांच्या इच्छा पूर्ण केल्या़़ दोन कोटीची आपल्याला थेट आॅफर नव्हती मात्र, दुसऱ्यांमार्फत ती आलेली होती़ आता ज्या समितीची जबाबदारी मिळेल त्याचे सर्व उर्वरित कामे मार्गी लावू, सर्व सदस्यांना न्याय देण्याची भूमिका ठेवू
-रवींद्र पाटील, नवनिर्वाचित सभापती
समाजकल्याण समितीला मिळालेला निधी खर्च झालेला नाही तो मार्गी लावणार, राहिलेली कामे पूर्ण करून ग्रामविकाससाठी पदाचा पूर्ण उपयोग करू,
-जयपाल बोदडे