जळगाव कृउबाच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत सुरेशदादा जैन गटाचे लकी टेलर विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 02:34 PM2017-11-21T14:34:40+5:302017-11-21T14:35:42+5:30

खडसे गटाचे प्रभाकर पवार पराभूत

Lucky_Taylor_ of_ Sureshdada_ Jain_group_ wins_ Jalgaon_ bajar_samiti_ Presidential election | जळगाव कृउबाच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत सुरेशदादा जैन गटाचे लकी टेलर विजयी

जळगाव कृउबाच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत सुरेशदादा जैन गटाचे लकी टेलर विजयी

googlenewsNext
ठळक मुद्देप्रभाकर पवार यांनी मतदानापूर्वी घेतली लकी टेलर यांच्या उमेदवारीवर लेखी हरकतनिवडणुक अधिकाºयांनी फेटाळली हरकत.सभापतीपदाची पुढची संधी अनिल भोळेंना

जळगाव: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंगळवार दि.२१ रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या सभापती निवडणुकीत सुरेशदादा जैन गटाचे लक्ष्मण गंगाराम पाटील (लकी टेलर) व खडसे गटाचे प्रभाकर पवार यांच्यात लढत झाली. त्यात १७ पैकी १४ सदस्यांनी हात उंचावून लकी टेलर यांच्या बाजूने मतदान केल्याने ते विजयी झाले. तर प्रभाकर पवार यांनी मतदानात सहभाग घेतला नाही तर दोन सदस्य तटस्थ राहिले. पवार यांनी मतदानापूर्वी लकी टेलर यांच्या उमेदवारी अर्जावर लेखी हरकत घेतली. ती निवडणुक अधिकाºयांनी फेटाळली. मात्र मतदान घेण्याचा अधिकारच निवडणूक अधिकाºयांना नाही, असा दावा करीत पवार यांच्यासह तीन सदस्यांनी मतदानात भाग घेतला नाही.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक प्रकाश नारखेडे यांनी दोन वर्षे उलटूनही सभापतीपदाचा राजीनामा न दिल्याने  त्यांच्या विरोधात अविश्वास  ठराव  मंजूर झाला होता. सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या तीन संचालकांनी देखील शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर झालेल्या घडामोडीत भाजपाचे प्रविण भंगाळे यांनीही सेनेला पाठिंबा देत सेनेची संख्या १४ झाली होती.  
ऐनवेळी अर्ज दाखल
सभापती निवडीसाठी कृउबा संचालक मंडळाची विशेष सभा मंगळवार दि.२१ रोजी सकाळी ११ वाजता कृउबातील सभागृहात झाली. निवडणूक निर्णय अधिकाºयांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. ११ वाजून १० मिनिटांनी सभापतीपदासाठी उमेदवारी अर्जांचे वाटप करण्यात आले. त्यात अनिल बारसू भोळे, प्रभाकर गोबजी पवार यांनी प्रत्येकी १ तर लक्ष्मण गंगाराम पाटील (लकी टेलर) यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यावेळी प्रभाकर पवार यांनी लकी टेलर हे विकसो गटातून निवडून आले असले तरीही त्यांचे इतरही व्यवसाय आहेत. त्यामुळे ते निवडणूक लढविण्यास अपात्र असल्याची लेखी हरकत घेतली. मात्र निवडणूक अधिकाºयांनी ही संचालकपदाची नव्हे तर सभापती पदाची निवडणूक असल्याचे सांगत ही हरकत फेटाळून लावली. तसे लेखी उत्तर पवार यांना दिले. मात्र पवार यांनी ते उत्तर स्विकारण्यास नकार देत निवडणूक अधिकाºयांनी मतदान घेऊ नये, त्यांना अधिकार नाही, असा दावा करीत विरोध केला.

उमेदवार, अधिकाºयांची फोनाफोनी
पवार यांच्या हरकतीनंतर सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. निवडणूक अधिकारी शिवाजी बारहाते यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तसेच पवार यांनीही फोनाफोनी केली. त्यामुळे लकी टेलर यांनीही सभागृहातून बाहेर येत फोनाफोनी केली. त्यानंतर ते पुन्हा आत गेले. या वादावादीनंतर अखेर निवडणूक अधिकाºयांनी निवड प्रक्रिया सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. पवार यांना हरकत फेटाळल्याचे पत्र दिले मात्र त्यांनी ते स्विकारले नसल्याबाबत कैलास चौधरी यांच्यासह चौघांची साक्षीदार म्हणून स्वाक्षरीही घेतली. त्यानंतर माघारीसाठी मुदत देण्यात आली.
हात उंचावून मतदान
माघारीच्या मुदतीत अनिल बारसू भोळे यांनी लकी टेलर यांच्यासाठी माघार घेतली. त्यामुळे प्रभाकर पवार व लकी टेलर यांचेच अर्ज उरले. त्यावर हात उंचावून मतदान घेण्याची मागणी १३ सदस्यांनी केली. ती निवडणूक अधिकाºयांनी मान्य केली. त्यानुसार मतदान झाले.  त्यात १४ सदस्यांनी मतदान केले. तर प्रभाकर गोटू सोनवणे व प्रकाश नारखेडे यांनी मतदानात सहभाग घेतला नाही. तर प्रभाकर पवार यांनी मतदानावर बहिष्कार टाकला. त्यामुळे लकी टेलर विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाºयांनी घोषीत केले,
फटाक्यांची आतषबाजी
निवड झाल्याचे जाहीर होताच कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या आवारातच फटाक्यांची आतषबाजी करीत ढोल-ताशांच्या जल्लोषात गुलाल उधळला.

सभापतीपदाची पुढची संधी अनिल भोळेंना
लकी टेलर यांनी सांगितले की, त्यांचे खंदे समर्थक अनिल बारसू भोळे यांना या टर्मच्या शेवटी काही दिवस सभापतीपदाची संधी दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच ३ वर्षात सुरेशदादांनी दिलेल्या आदेशानुसार वेळोवेळी उपसभापतीपदाची संधी दिली जाईल. आताही उपसभापतीपदाचा बदल करण्यात येणार असून मनोहर भास्कर पाटील यांना संधी दिली जाणार आहे.

सर्वांना सोबत घेऊन पारदर्शी कामकाज करू
निवडीनंतर नूतन सभापती लकी टेलर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कृउबात शेतकरी, व्यापारी, कर्मचारी व हमाल मापाडी या सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील. तसेच पारदर्शकपणे व्यवहार करू. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न राहील. माजी मंत्री सुरेशदादा जैन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठबळामुळेच हे पद मिळविता आले. त्यांचा तसेच सहकारी संचालकांचा आभारी आहे.

Web Title: Lucky_Taylor_ of_ Sureshdada_ Jain_group_ wins_ Jalgaon_ bajar_samiti_ Presidential election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.