दुसऱ्या लाटेत जीएमसीतील १५ टक्के रुग्णांना ‘लंग फायब्रोसिस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:12 AM2021-07-10T04:12:36+5:302021-07-10T04:12:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आनंद सुरवाडे जळगाव : कोविड संपत असला तरी काही रुग्णांवर याचे गंभीर परिणाम समोर येत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आनंद सुरवाडे
जळगाव : कोविड संपत असला तरी काही रुग्णांवर याचे गंभीर परिणाम समोर येत आहेत. लाँग कोविडमुळे दुसऱ्या लाटेत १५ टक्के रुग्णांची फुफ्फुसे हे कोणाचे अधिक तर कोणाचे काही प्रमाणात निकामी झाले आहेत. त्यांना ‘लंग फायब्रोसिस’ झाल्याची माहिती असून अशा रुग्णांना महिनाभरापेक्षाही अधिक काळ ऑक्सिजनवर ठेवावे लागत आहे. सद्य:स्थिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ८ रुग्ण हे दीड महिन्यांपेक्षा अधिक काळ ऑक्सिजनवरच उपचार घेत आहेत.
कोविड हा थेट फुफ्फुसांवर हल्ला करणारा विषाणू आहे. यामुळे फुफ्फुसाच्या कार्यावर परिणाम होतो. ज्यांना गंभीर प्रकारचा न्यूमोनिया आहे, त्यांचे यात मृत्यूही झाले आहेत. मात्र, अनेक रुग्णांना याचा आयुष्यभरही त्रास राहू शकतो, किंवा त्यांना वारंवार ऑक्सिजन लावावे लागू शकते, दुसऱ्या लाटेत ‘लंग फायब्रोसिस’ झालेल्यांची संख्या ही वाढून १५ टक्क्यांपर्यंत गेल्याचे औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांनी सांगितले. सद्य:स्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २२ रुग्णांवर उपचार सुरू असून यातील ८ ते १० रुग्णांवर दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून उपचार सुरू आहेत. त्यांची ऑक्सिजन पातळी ही सामान्य होत नसल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे, असेही डॉ. नाखले यांनी सांगितले.
काय आहे ‘लंग फायब्रोसिस’?
कोविड विषाणुमुळे फुफ्फुसांमध्ये फायब्रस टिश्यू जमा होतात. त्यामुळे श्वासोच्छास घेण्याच्या प्रकियेत अडथळा निर्माण होतो. कोविडनंतर याचे परिणाम कायम राहतात, यात फुफ्फुसे निकामी होतात, अनेकांना यात फुफ्फुस प्रत्यारोपणाशिवाय कुठलाच पर्याय राहत नाही, असेही डॉ. नाखले सांगतात. अनेक रुग्णांना घरी नेहमी ऑक्सिजनची व्यवस्था करण्यासही सांगण्यात आले आहे.
नॉन कोविड सुरू झाल्यानंतर समोर येतील रुग्ण
अनेक रुग्ण सद्य:स्थिती पोस्ट कोविड समस्या असल्या तरी समोर येत नाहीय, मात्र, नॉन कोविड यंत्रणा सुरू झाल्यानंतर अशा रुग्णांची माहिती समोर येणार आहे. यात अनेकांना कोविड होऊन गेल्यानंतर दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे अशा काही समस्यांचा सामना करावा लागतो.
अशी आहे आकडेवारी
उपचार सुरू असलेले रुग्ण : २२
ऑक्सिजनवरील रुग्ण १० (दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून उपचार)
अतिदक्षता विभागात उपचार ६
जीएसीतील रुग्णांची स्थिती
पहिल्या लाटेतील रुग्ण : ४०८७
दुसऱ्या लाटेतील रुग्ण : ३७२३
फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी झालेले रुग्ण १५ टक्के