लग्न जुळवून देण्याचे आमिष; तरुणाची दीड लाखात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:19+5:302021-07-05T04:12:19+5:30

पाचोरा, जि. जळगाव : लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाची दीड लाखात फसवणूक करणाऱ्या जामनेर तालुक्यातील ...

The lure of matching marriage; Youth cheated for Rs 1.5 lakh | लग्न जुळवून देण्याचे आमिष; तरुणाची दीड लाखात फसवणूक

लग्न जुळवून देण्याचे आमिष; तरुणाची दीड लाखात फसवणूक

Next

पाचोरा, जि. जळगाव : लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाची दीड लाखात फसवणूक करणाऱ्या जामनेर तालुक्यातील एका दलालास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लग्नाची वेळ आली तरी नवरी मुलगी न आल्याने हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

राजेश्वर नारायण पाटील (रा. पळासखेडा गुजर, ता. जामनेर) असे या ताब्यात घेण्यात आलेल्या दलालाचे नाव आहे. पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, दुसखेडा, ता. पाचोरा येथील रवींद्र प्रकाश पाटील (३२) या युवकाच्या लग्नासाठी मुलीचा शोध सुरू होता. यासाठी त्याची चुलत बहीण विद्या सुनील पाटील (रा. पळसखेडा (गुजर), ता. जामनेर) हिनेदेखील प्रयत्न केले. अन्य समाजाची मुलगी असली तरी चालेल, असे सांगत विद्या हिच्या शेजारील रहिवासी राजेश्वर पाटील हा मुलीचा शोध घेऊन लग्न जुळवून देत असल्याचे सांगितले.

रवींद्रचे लग्न जुळवून देण्यासाठी राजेश्वर याने ३० हजार रुपयांची मागणी केली. ते त्याला देण्यात आले. मात्र ज्या मुलीचे स्थळ सुचविले ती पळून गेल्याचे सांगत अन्य मुलीचा शोध घेण्याचे ठरले. राजेश्वर याने व्हॉट्सॲपवर पंढरपूर येथील मुलीचा फोटो दाखवून लग्न निश्चित केले. त्यासाठी दागिने घेण्यासाठी मुलीच्या वडिलांनी एक लाख १० हजार रुपये दिले. यानंतर लग्नासाठी २२ जून ही तारीख ठरली. इकडे दुसखेडा येथे २१ रोजी नातेवाईक मंडळी लग्नासाठी हजर झाली. रवींद्रला हळद लागली. मात्र २२ रोजी नवरी मुलगी पोहोचलीच नाही. राजेश्वर याचा मोबाइल बंद होता.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रवींद्र याने शनिवारी रात्री पाचोरा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून या दलालाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. प्रकाश पाटील करीत आहेत.

दलाल राजेश्वर यास ताब्यात घेण्यात आले आहे. तो अमरावती जिल्ह्यातील असून दोन वर्षांपूर्वी तो वाडी शेवाळे, ता. पाचोरा येथे राहत होता. आता पळासखेडे, ता. जामनेर येथे राहत आहे.

Web Title: The lure of matching marriage; Youth cheated for Rs 1.5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.