पारोळ्याजवळ लक्झरी बसला अपघात, १५ प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 04:56 PM2019-02-19T16:56:08+5:302019-02-19T16:57:56+5:30
पारोळा शहराजवळ आशिया महामार्ग क्रमांक ४६ वर मंगळवारी सकाळी ७.३० वाजता लक्झरी बस उलटून त्यात १५ प्रवासी जखमी झाले. यातील पाच गंभीर जखमींना धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
पारोळा : आशिया महामार्ग क्रमांक ४६ वर पारोळ्यानजीक हिरापूर फाट्याजवळ समोरून अचानक अंगावर आलेल्या ट्रकपासून वाचण्याच्या प्रयत्नात चालकाने लक्झरी बस रस्त्याच्या साईडपट्टीवर उतरविली, तथापि त्याचे नियंत्रण सुटल्याने सदर बस उलटली. यात १५ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. यातील पाच जणांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना धुळे येथे हलविण्यात आले आहे.
१९ रोजी सकाळी अमळनेरहून जळगांवकडे जाणारी लक्झरी बस ( क्रमांक- एमएच १९ वाय- ७७६३ ) या वरील चालक मालक सुरेश राजाराम पाटील (६२ रा. देवळी ता अमळनेर ) हे प्रवासी घेऊन पारोळा येथून जळगांवकडे जात असताना सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास महामार्गावर हिरापूर फाट्याजवळ समोरून अंगावर येणाऱ्या ट्रकपासून वाचण्याच्या प्रयत्नात ही लक्झरी बस रस्त्याच्या कडेला साइड पट्टीवर उतरली आणि खड्डयात पडल्याने त्यातील १५ प्रवासी जखमी झाले. या जखमीत तीन बालकांचा व ६ महिलांचा समावेश आहे . जखमींमध्ये मीनाबाई विश्वास पाटील (४५) सुमनबाई संजय पाटील (३७), बाबुलाल संपत पाटील (६८), गौरव विनोद पाटील (७), शीतल विनोद पाटील (२५), राज विनोद पाटील ( ५) , श्रीराम संपत पाटील (७०)सर्व रा. म्हसवे ता. पारोळा तसेच गुलाब बंडू पाटील (५९) नवकाबाई बंडू पाटील (७०) दोन्ही रा. पातरखेडे ता. एरंडोल. साक्षी चंपालाल पाटील (१२), शैला चंपालाल पाटील (२५) दोन्ही रा. भिलाली ता. पारोळा. मंगला संदीप पाटील (४०), संदीप प्रल्हाद पाटील (४५) रा. जळगाव, भास्कर हिरामण पाटील (६३) बहादरपूर ता. पारोळा व चालक सुरेश राजाराम पाटील यांचा समावेश आहे
या जखमींना रुग्णवाहिका चालक रोशन पाटील याने प्राथमिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयात आणले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश साळुंखे, डॉ. सुनिल पारोचे, दीपक सोनार, राजू सोनार, राजू वानखेडे यांनी जखमींवर उपचार केले. यापैकी मीनाबाई पाटील, श्रीराम पाटील, मंगला पाटील, बाबुलाल पाटील, गुलाब पाटील या ५ जणांना धुळे येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.