पोलिस शिपायाच्या शर्यतीत धावताहेत एमए, एमएससी, इंजिनिअर
By विजय.सैतवाल | Published: June 19, 2024 11:25 PM2024-06-19T23:25:41+5:302024-06-19T23:25:55+5:30
पोलिस भरती प्रक्रियेत उच्च शिक्षित रांगेत
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पोलिस दलातील भरती प्रक्रियेदरम्यान मैदानी चाचणीला बुधवार, १९ जूनपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी ५०० पुरुष उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात आले होते. यापैकी २९६ उमेदवार उपस्थित होते. या भरतीत अनेक उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत. मात्र बेरोजगारीमुळे हे सर्वच जण आपले नशीब पोलिस शिपाई पदाच्या शर्यतीत आजमावत आहेत.
राज्यात पोलिस दलात विविध संवर्गातील १७ हजार पदांची भरती सुरू आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात पोलिस शिपाई या पदासाठी १३७ जागांसाठी बुधवार, १९ जूनपासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली. मैदानी चाचणीला सुरुवात झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्यासह सर्व प्रभारी अधिकारी हे विविध प्रक्रियेत सहभागी झाले. या भरतीत नशीब आजमावणारे अनेक उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत. यात कुणी एम.ए. झालंय तर कुणी बी.एस्सी.. हे कमी की काय अनेक जण तर इंजिनिअर सुद्धा आहेत.
मैदानी चाचण्यांना सुरुवात होऊन यात उमेदवारांना प्रथम बसण्याची व्यवस्था करण्यात आली. तेथे अर्ज भरल्यानंतर ५०-५० जणांना पुढे पाठविण्यात आले. तेथे उंची, छाती, छाती फुगवणे यांची मोजणी झाली. त्यात जो उत्तीर्ण झाला त्याला पुढे पाठविण्यात आले. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. तेथून पुढे बायोमेट्रीक फिंगरप्रिंट घेऊन त्यांना चेस्ट क्रमांक देण्यात आले. त्यानंतर उमेदवारांकडून १०० मीटर, १६०० मीटर धावणे, गोळाफेक यांचे प्रात्यक्षिक करुन घेण्यात आले. यासाठी कोण किती वेळात किती धावले, याच्या अचून नोंदणीसाठी उमेदवारांच्या पायावर चिप लावण्यात आली होती.
चार ते पाच गुणांनी संधी हुकलेल्यांना पुन्हा आशा
पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांपैकी अनेक उमेदवारांनी या पूर्वीही वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी प्रयत्न केलेले आहे. त्या वेळी कोणाची चार तर कोणाची पाच गुणांनी संधी हुकलेली आहे. मात्र आता अधिक तयारी केली असून या वेळी पोलिस दलात पोहचण्याचा विश्वास अनेकांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे पोलिस दलासह भारतीय सैन्य, राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा विविध विभागांमध्ये परीक्षा दिलेली आहे. मात्र तेथे काही गुणांनी संधी हुकल्याचे तरुणांनी सांगितले.
खासगी क्षेत्रात नोकरीची हमी नाही
भरतीसाठी आलेले बहुसंख्य तरुण हे ग्रामीण भागातील आहेत. उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना नोकरी मिळत नसल्याने तसेच खासगी क्षेत्रात नोकरीची हमी नाही, अशा विपरीत परिस्थितीत पोलिस भरतीची संधी चालून आली आहे. त्यामुळे उच्च शिक्षित तरुण इयत्ता बारावी उत्तीर्ण या शिक्षणाच्या अटीवर होणाऱ्या पोलिस शिपाई पदाच्या शर्यतीत धावत आहे.
उमेदवारांना एनर्जीची चिंता
पोलिस भरती मैदानी चाचणीसाठीच्या प्रक्रियेत काही उमेदवारांचा क्रमांक नंतर येत गेल्याने उन झाले. त्यामुळे उन्हात आता एनर्जी कमी होऊन काय परिणाम होऊ शकतो, हे सांगता येत नाही, असे काही उमेदवारांनी सांगितले.
शिपाई का असेना पण सरकारी नोकरी
शिपाई का असेना पण नोकरी सरकारी मिळतेय ना, मग प्रयत्न करायला काय हरकत आहे, याच मानसिकतेत अनेक तरुण असल्याचे या भरतीवेळी दिसून आले. बेरोजगारी वाढत चालली असून ती एक सामाजिक समस्या बनली आहे, त्यामुळे उच्चशिक्षित तरुण पोलिस भरतीसाठी ठिकठिकाणी जात असल्याचे उमेदवारांच्या बोलण्यातून जाणवले.
आजपासून एक हजार उमेदवार
पहिल्या दिवशी अर्थात १९ रोजी ५०० पुरुष उमेदवारांना बोलाविले होते. २९६ उमेदवारांची चाचणी घेण्यात आली. दुसरा दिवस २० जून ते २३ जून दरम्यान प्रत्येक दिवशी एक-एक हजार उमेदवारांना तर २४ रोजी ७२४ उमेदवारांना चाचणीसाठी बोलविले जाणार आहे. त्यानंतर २५ जून रोजी एक हजार ३६२ महिला उमेदवार व एक तृतीय पंथीय उमेदवारास बोलविले जाणार आहे.
मैदानी चाचणीला ५०० पैकी २९६ उमेदवार
मैदानी चाचणीसाठी पहिल्या दिवशी ५०० उमेदवारांना बोलवण्यात आले होते. त्यापैकी केवळ २९६ उमेदवार उपस्थित राहिले. उर्वरित उमेदवार एक तर इतर जिल्ह्यात चाचणीसाठी गेले असावे, असा अंदाज आहे.
५९ जण छाती, उंचीत अपात्र
मैदानी चाचणीसाठी आलेल्या २९६ उमेदवारांपैकी ५९ उमेदवार छाती, उंची मोजणीवेळी अपात्र ठरले. त्यामुळे आलेल्यांपैकी केवळ २३७ उमेदवारांची मैदानी चाचणी होऊ शकली. या सोबतच दोन उमेदवारांना पुढील तारीख देण्यात आली.
गोळाफेकसाठी तीन संधी
गोळाफेकसाठी उमेदवारांना तीन संधी दिल्या जात होत्या. यामध्ये सर्वांत लांब अंतर जे असेल ते त्या उमेदवारासाठी ग्राह्य धरले जात होते.
चिअरअप
उमेदवार धावत असताना त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पुढाकार घेत आपल्या सहकाऱ्यांनादेखील चिअरअप करण्यास सांगितले. त्यामुळे सर्वच जण उमेदवारांना प्रोत्साहीत करीत होते.
दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध
पोलिस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीला सुरुवात झाली असून उमेदवारांचा उत्साह आहे. संपूर्ण भरती प्रक्रियेवर सीसीटीव्हींची नजर आहे. पोलिस भरतीसाठी उमेदवारांना कोणी मदत करणार असल्याचे सांगत असेल तर त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. कोणी एजंट व कोणी मध्यस्थी करणारा सांगत असले तर त्यांच्यापासून सावद रहावे.
- डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा पोलिस अधीक्षक