चाळीसगाव शहरासह तालुक्यात माेठी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 10:22 PM2021-05-15T22:22:47+5:302021-05-15T22:23:03+5:30
चाळीसगाव शहरासह तालुक्यात सात जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी शुक्रवार रोजी दिवसभरात धाडी टाकून एकूण ५४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : कोरोनाचे सावट असतानाही अक्षय तृतीयेनिमित्ताने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शुक्रवारी जुगार खेळला गेला. शहरासह तालुक्यात सात जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी शुक्रवार रोजी दिवसभरात धाडी टाकून एकूण ५४ जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. शहरातील नालंदा विद्यालयाच्या आवारात जुगाराची शाळा भरली.
चाळीसगाव शहरातील जय बाबाजी चौकात १२ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आठ हजार ९०० रुपयांची रोकड जप्त केली आहे. करगावरोडवरील वामननगरातही लिंबाच्या झाडाखाली नऊ जुगाऱ्यांकडून ९ हजार ७२० रुपये व जुगाराची साधने पोलिसांनी हस्तगत केली आहेत. तिसरी कारवाई शहरातील नालंदा विद्यालयाच्या आवारात सहा जणांच्या ताब्यातून एक लाख ३० हजार ३५० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले.
करगाव तांडा नंबर ३ मध्ये जुगार खेळणाऱ्या सहा जणांकडून ११ हजार ४४० रुपये पोलिसांनी ताब्यात घेतले. मालेगाव रस्त्यावर अन्नपूर्णा हॉटेलच्या बाजूला सुरू असलेल्या तीन जुगार अड्ड्यांवर धाडी टाकून एकूण १८ जणांना अटक करून त्यांच्याकडून १ लाख ९३ हजार ५०० रुपये जप्त केले. तालुक्यातील हातले शिवारातील हॉटेल नक्षत्रवर पोलिसांनी शुक्रवारी रात्री धाड टाकली असता तेथे संशयित योगेश दराडे हा २ हजार ८६४ रुपयांची देशी-विदेशी दारू विक्री करताना मिळून आला.