शंकर-६ समोर महाकॉट कापूस ठरला सरस

By admin | Published: November 17, 2016 12:46 PM2016-11-17T12:46:02+5:302016-11-17T13:37:55+5:30

महाकॉट ब्रॅण्डच्या रूईला गुजरातच्या शंकर ६ च्या तुलनेत एक हजार रुपये जादा भाव मिळू लागला आहे.

Mahakot cotton is the front of Shankar-6 | शंकर-६ समोर महाकॉट कापूस ठरला सरस

शंकर-६ समोर महाकॉट कापूस ठरला सरस

Next

-चंद्रकांत जाधव

जळगाव, दि. 17 - खान्देशचा कापूस गुजरातेत नेऊन तेथे रूई बनवून शंकर-६ या ब्रॅण्डने त्या रूईची विक्री करून गुजराती जिनर्स खंडीमागे (३०० किलो रुई) दोन हजार रुपये जादा भाव मिळवायचे. जळगावच्या जिनर्सनी यावर उपाय म्हणून कापसावर खान्देशातच प्रक्रिया करून त्यापासून जागतिक दर्जाची रूई तयार करून महाकॉट बॅण्ड विकसित केला. त्याला जगभर पोहोचविण्यासाठी सतत पाच वर्षे काम केले. त्याचे फलित की काय आता महाकॉट ब्रॅण्डच्या रूईला गुजरातच्या शंकर ६ च्या तुलनेत एक हजार रुपये जादा भाव मिळू लागला आहे. 
 
खान्देशात जळगावात साडेचार लाख, धुळ्यात दीड लाख तर नंदुरबारात एक लाख हेक्टरवर दरवर्षी कापसाची लागवड होते. विदर्भानंतर खान्देश कापूस उत्पादनात पुढे आहे. खान्देशातील कापूस उद्योगाला जवळपास ११५ वर्षांचा इतिहास असून, १०० वर्षांपूर्वी जळगावात कापसापासून रूई तयार करण्यासंबंधी जिनींग उभ्या झाल्या. कापूस मुबलक प्रमाणात मिळत असल्याने जिनींगची संख्याही वाढली. 
 
गुजरातचा शिरकाव व आव्हान
जशा खान्देशात जिनींग वाढल्या तशा गुजरातेतही वाढल्या. पण गुजरात राज्यात फक्त २२ लाख हेक्टरपर्यंत कापसाची लागवड होते. तेथे जिनींग अधिक, पण रूईसाठी कापूस अपूर्ण, अशी स्थिती होती. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातून गुजरातमधील जिनर्स एजंटच्या माध्यमातून चार ते पाच लाख गाठींचा (१७० किलो रुई) कापूस दरवर्षी नेऊ लागले. गुजरातच्या वेगवेगळ््या भागात खान्देशी कापूस जाऊ लागला. गुजरातेत देशी कपाशीची अधिक लागवड होते. त्यात लांबी, ताकदीसंबंधी उत्तम असलेल्या खान्देशी कापूस मिसळून गुजरातेत शंकर ६ या ब्रॅण्ड अंतर्गत रुईची निर्मिती सुरू झाली व त्याला जागतिक पातळीवरून मागणीही वाढली. 
 
महाकॉटचा जन्म
रूईच्या निर्मितीत गुजरात हा महाराष्ट्रापुढेही गेला. राज्यात ८६ लाख तर गुजरातेत ९६ लाख गाठींवर निर्मिती सुरू झाली. साहजिकच तेथे जागतिक व देशांतर्गत मोठ्या बाजारातील रूई खरेदीदार पोहोचले. दुसऱ्या बाजूला जळगावचा किंवा खान्देशचा कापूस किंवा रुई मात्र कमी भावात विकली जाऊ लागली. शंकर- ६ च्या तुलनेत जळगावच्या गाठींना दोन हजार रुपये कमी भाव, अशी स्थिती २०१० पर्यंत कायम होती. 
 
व्यापारी, उद्योजक, जिनर्स एकत्र
गुजरातच्या शंकर ६ चे संकट लक्षात घेता खान्देश, मलकापूर, औरंगाबादचे जिनर्स २०११ मध्ये एकत्र आले. माजी मंत्री सुरेशदादा जैन, खान्देश जीन प्रेस कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन, औरंगाबादचे भूपेंद्रसिंग राजपाल, मलकापूरचे त्रिलोद दंड, अरविंद जैन यांच्या उपस्थितीत व.वा.वाचनालयाच्या सभागृहात नोव्हेंबर २०११ मध्ये बैठक झाली. त्यात खान्देशतील प्रमुख रूई उत्पादक भागांनीही एकत्र येऊन महाकॉट अंतर्गत रूईचे ब्रॅण्डींग  करण्यावर एकमत झाले. 
 
राज्यभर लॉचींग
महाकॉटची २०१३ मध्ये एक आंतरराष्टीय बैठक जैन हिल्सवर घेऊन लॉचींग करण्यात आली. यानिमित्ताने महाकॉट देशांतर्गत बाजारासह जगात अनेक व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यात आला. 
 
दरवर्षी उत्पादन वाढ
महाकॉटची दरवर्षी उत्पादन वाढ होत आहे. २०१३ मध्ये १२ लाख गाठी, २०१४ मध्ये १३ लाख, २०१५ मध्ये १८ लाख तर यंदा २० लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज आहे. 
 
महाकॉटला जादा भाव
सध्या जागतिक बाजारात खंडीला ३९५०० रुपये भाव आहे. महाकॉटला मात्र ४० हजार ५०० रुपये भाव मिळत आहे. चीनसह पाकिस्तान, व्हीएतनाम, बांगलादेश, कजाकिस्तान, दाक्षिणात्य कापड मिल, एम.एस.मिश्रा, गील अ‍ॅण्ड गील, नहार, वर्धमान अशा अनेक संस्था, देशांकडून महाकॉटला मागणी आहे. 
 
गुजरातमध्ये आपला कापूस नेऊन तेथे त्याची रूई बनवून शंकर ६ या बॅ्रण्डने विक्री केली जायची व ते चांगला भावही मिळवायचे. यात तोटा आपल्या कापूस उत्पादकांचा होता. ही बाब लक्षात घेत आम्ही बुलडाणा, औरंगाबाद, जळगाव, धुळ््याचे जिनर्स एकवटलो व महाकॉटची निर्मिती सुरू केली. त्याचे फलित म्हणजे आपल्या खंडीला (३०० किलो रुई) एक हजार रुपये जादा भाव मिळतो. 
- प्रदीप जैन, अध्यक्ष, खान्देश जीन प्रेस असोसिएशन
महाकॉट आता खान्देश, बुलडाणा, मलकापूरपुरता मर्यादीत नाही. आपण सर्वांनी मिळून आता महाराष्ट्र कॉटन असोसिएशन स्थापन केली आहे. मराठवाड्यातही महाकॉट पाय रोवत असून, कापूस उत्पादकांच्या पदरात दोन पैसे अधिक कसे मिळतील यासाठी काम सुरू आहे. 
- अरविंद जैन, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया
 

 

Web Title: Mahakot cotton is the front of Shankar-6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.