महानगरी एक्सप्रेसमध्ये गुंगीचे बिस्किट खाऊ घालून रेल्वे प्रवाशांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 01:22 PM2018-03-25T13:22:54+5:302018-03-25T13:22:54+5:30
दोघं प्रवाशी जिल्हा रुग्णालयात दाखल
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २५ - गेल्या आठवड्यात महानगरी एक्सप्रेसच्या जनरल बोगीतून प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांनी चोरट्यांनी गुंगीचे बिस्कीट खायला देवून लुटल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा त्याच महानगरी एक्सप्रेसमध्ये मोहन कन्नोजिया (वय २७, रा.गोसाईपुर तरटी, फत्तुपर, जि.जौनपुर, उत्तर प्रदेश) व हरींदर जंगी भारटी (वय ५४ रा.आनंद नगर, ठाणे) या दोघांना गुंगीचे बिस्कीट खायला देत ४ हजार रुपये रोख व साडे सात हजार रुपये किमतीचा मोबाईल लुटल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. यातील दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मोहन कन्नोजिया व हरींदर जंगी भारटी प्रवाशी शुक्रवारी रात्री दीड वाजता कल्याण येथून महानगरी एक्सप्रेसमध्ये बसले होते.या प्रवासात दोघांना काही जणांनी गुंगीचे बिस्कीट खायला दिले.शनिवारी सकाळी साडे सात वाजता भुसावळ येथे गाडी आली असता दोघंही हालचाल करीत नसल्याचे रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाच्या लक्षात आले. त्यांनी अन्य सहकाºयांच्या मदतीने त्यांना गाडीमधून उतरविले. रेल्वे सुरक्षा बलाच्या गुन्हे शाखेचे निरीक्षक अतुल टोके, उपनिरीक्षक आर.के.सिंग, प्रधान आरक्षक प्रवीण बºहाटे, शेख मेहमूद यांनी दोघांना बेशुध्दावस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या आठवड्यात १८ मार्च रोजी अनिलकुमार, संजयसिंग (दोन्ही रा.मिर्झापूर, उत्तर प्रदेश) व अजगर अली (रा.वाराणसी) या प्रवाशांना चोरट्यांनी गुंगीचे बिस्किट खायला देऊन १२ हजाराची रोख रक्कम व मोबाईल लुटले होते.