राजकारण्यांच्या दुर्लक्षामुळे अस्त पावली महाफेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:12 AM2021-01-09T04:12:33+5:302021-01-09T04:12:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव जिल्हा एकेकाळी केळी आणि कापसाबरोबरच तेलबियांच्या उत्पादनात अग्रेसर होता. धुळे, अमळनेर, एरंडोल, चोपडा, ...

Mahaphed collapsed due to negligence of politicians | राजकारण्यांच्या दुर्लक्षामुळे अस्त पावली महाफेड

राजकारण्यांच्या दुर्लक्षामुळे अस्त पावली महाफेड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव जिल्हा एकेकाळी केळी आणि कापसाबरोबरच तेलबियांच्या उत्पादनात अग्रेसर होता. धुळे, अमळनेर, एरंडोल, चोपडा, पारोळा या भागात भुईमूग, करडई, सूर्यफूल यांची मोठ्या प्रमाणात लागवड होत होती. मात्र १९९१ नंतर खान्देशातील राजकारण्यांच्या दुर्लक्षामु‌ळे येथून महाफेड (महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन)च्या परवडीला सुरुवात झाली. त्यानंतर २००० च्या जवळपास ही संस्था अवसायनात गेली आहे. त्यानंतर आतापर्यंत या संस्थेवर अवसायकच काम पाहत आहेत. सध्या धुळ्याचे जिल्हा उपनिबंधक हेच या संस्थेचे अवसायक म्हणून काम पाहत आहेत.

महाफेडच्या १९८९ च्या निवडणुकीत माजी आमदार सुरेशदादा जैन, माजी आमदार मुरलीधर पवार यांनी माजी खासदार ॲड. वसंतराव मोरे यांना अध्यक्ष करण्यात मोठी भूमिका बजावली होती. त्यानंतर १९९१ मध्ये स्व. धोंडू पाटील हे संस्थेचे अध्यक्ष होते. त्यानंतर माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या हातात या संस्थेची सूत्रे गेली. त्यांचे सहकारात वर्चस्व असल्याने त्यांनी या संस्थेचे कार्यालय धुळ्याला हलवले. तेल फॅक्टरीच्या आवारात हे कार्यालय होते. त्या वेळी सुभाष देवरे हे महाफेडचे अध्यक्ष बनले, तर २००१ मध्ये मनोहर त्रिभुवन यांना अवसायक म्हणून नेमण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत महाफेडवर अवसायकच आहे. विभागीय स्तरावर धुळ्याचे जिल्हा उपनिबंधक सहकार आणि पणन महासंघाचे संचालक हे या संस्थेचे काम पाहतात. हल्ली धुळ्यात महाफेडची चार हेक्टर जमीन, दोन गोदामे, मुंबईमध्ये फ्लॅट आणि मालाड मुंबई येथेही मालमत्ता आहे.

का झाले दुर्लक्ष?

१९९१-९२ च्या सुमारास जळगावला असलेले विभागीय चेअरमनचे कार्यालय धुळ्यात हलविण्यात आले. त्यानंतर या संस्थेच्या परवडीला सुरुवात झाली. धुळे हे तेलबियांसाठी प्रसिद्ध असूनही तेथील राजकारण्यांनी याकडे दुर्लक्ष केले. खान्देशातील कापूस आणि जळगावच्या प्रसिद्ध होणाऱ्या केळीमुळे तेलबियांकडे राजकारण्यांनी दुर्लक्ष केले.

काय झाले परिणाम?

महाफेड अस्तंगत झाल्याने जळगाव आणि धुळे जिल्ह्यात भुईमूग उत्पादकांना गेल्या २० वर्षात त्याचा मोठा फटका बसला आहे. अजूनदेखील या उत्पादकांना सरकार दरबारी जाऊन त्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देता आलेला नाही.

कोट - राजकारण्यांनी दुर्लक्ष केल्याने जळगावचे कार्यालय धुळ्यात हलविले गेले आणि नंतर गटाच्या राजकारणात एक चांगली संस्था अस्तंगत पावली. आज जर ही संस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत असती तर तेलबियांनाही हमीभाव मिळाला असता. ही संस्था पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न करू.

- संजय पवार, माजी संचालक, जळगाव जिल्हा बँक

Web Title: Mahaphed collapsed due to negligence of politicians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.