जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार

By Ajay.patil | Published: October 25, 2024 01:03 PM2024-10-25T13:03:32+5:302024-10-25T13:05:09+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : गेल्या निवडणुकांमध्ये जे उमेदवार आमने सामने लढले होते. तेच उमेदवार आज एकत्र येऊन प्रचार करत असल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यातील काही मतदारसंघांमध्ये दिसत आहे

Maharashtra Assembly Election 2024 BJP Shivsena jalgaon Assembly constituency Politics | जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार

जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार

जळगाव - राजकारणात कधी काय घडू शकते, हे सांगता येत नाही. गेल्या निवडणुकांमध्ये जे उमेदवार आमने सामने लढले होते. तेच उमेदवार आज एकत्र येऊन प्रचार करत असल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यातील काही मतदारसंघांमध्ये दिसत आहे तर दुसरीकडे जे उमेदवार गेल्या वेळेस एकत्र येऊन एकाच पक्षाचा प्रचार करत होते. ते उमेदवार मात्र यंदा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. 

सन २०१९ नंतर राज्यासह संपूर्ण जिल्ह्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या, या घडामोडींमुळे अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. 

त्याचे चित्र सध्याच्या निवडणुकीत दिसून येत आहे. २०१४ व २०१९ च्या निवडणुकांमध्ये जे उमेदवार एकमेकांच्या विरोधात टीकेची झोड उठवत होते. तेच उमेदवार आज एकाच व्यासपीठावर येऊन एकमेकांसाठी प्रचार करत आहेत. 

यांच्यात मात्र आला दुरावा...

२०१९ च्या निवडणुकीत पाचोरा मतदारसंघात विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्यासाठी वैशाली सूर्यवंशी यांनी एकत्र येऊन काम केले होते. मात्र, या निवडणुकीत हे दोन्ही उमेदवार आमने-सामने आले आहेत. 

गेल्या निवडणुकीत चाळीसगाव मतदारसंघातही भाजपचे मंगेश चव्हाण व तत्कालीन खासदार उन्मेष पाटील हे एकत्र होते. तर यंदाच्या निवडणुकीत मात्र दोन्ही उमेदवार एकमेकांच्या समोर आहेत. 

जळगाव ग्रामीण 

२०१४ च्या निवडणुकीत युती तुटल्यामुळे शिवसेना व भाजप एकमेकांच्या विरोधात लढले होते. त्यावेळेस भाजपकडून पी. सी. पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती तर शिवसेनेकडून गुलाबराव पाटील हे मैदानात होते. या निवडणुकीत गुलाबराव पाटील हे विजयी झाले होते तर २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तस्दे यांनी गुलाबराव पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत पी. सी. पाटील व चंद्रशेखर अत्तरदे दोन्हीही नेते गुलाबराव पाटील यांच्यासाठी एकत्र येऊन प्रचार करत आहेत. 

जळगाव शहर 

जळगाव शहर मतदारसंघातही २०१४ मध्ये भाजपचे उमेदवार सुरेश भोळे यांच्याविरोधात काँग्रेसकडून डॉ. राधेश्याम चौधरी यांनी निवडणूक लढविली होती तर २०११ मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसकडून अभिषेक पाटील यांनी सुरेश भोळे यांच्याविरोधात निवडणूक लढविली. यंदाच्या निवडणुकीत डॉ. राधेश्याम चौधरी यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे तर राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत असल्यामुळे अभिषेक पाटील हे भाजप उमेदवार सुरेश भोळेसाठी प्रचारात सहभाग घेत आहेत.

जामनेर मतदारसंघ 

जामनेर मतदारसंघात विद्यमान आमदार गिरीश महाजन यांच्या विरोधात २००४, २००९ व २०१९ या निवडणुकांमध्ये संजय गरुड यांनी उमेदवारी केली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी गरुड यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत गरुड गिरीश महाजनांसोबत दिसत आहेत. 

चाळीसगाव मतदारसंघ 

या मतदारसंघात २०१४ मध्ये भाजपकडून उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर राष्ट्रवादीकडून राजीव देशमुख हे मैदानात होते. या निवडणुकीत उन्मेष पाटील यांचा विजय झाला होता. यंदाच्या निवडणुकीत उद्धव सेनेकडून उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता राजीव देशमुख व उन्मेष पाटील हे एकत्र येऊन मविआचा प्रचार करत आहेत. 
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 BJP Shivsena jalgaon Assembly constituency Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.