घरात मृतदेह असताना परिवाराने बजावला मतदानाचा हक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 12:53 PM2024-11-21T12:53:03+5:302024-11-21T12:54:31+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या दिवशी छायाबाई राजेंद्र बच्छे (४०) यांचे आकस्मिक निधन झाले. हे सर्व दुःख विसरून पती राजेंद्र नामदेव बच्छे यांनी परिवारातील सदस्यासह मतदानाचा हक्क बजावला.
कैलास अहिरराव
कळमडू, ता. चाळीसगाव - मतदानाच्या दिवशी छायाबाई राजेंद्र बच्छे (४०) यांचे आकस्मिक निधन झाले. हे सर्व दुःख विसरून पती राजेंद्र नामदेव बच्छे यांनी परिवारातील सदस्यासह मतदानाचा हक्क बजावला आणि आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडले. ही घटना कळमडू (ता. चाळीसगाव) येथे बुधवारी सकाळी घडली.
राजेंद्र नामदेव बच्छे हे शेतमजुरी करून पोट भरणारे कुटुंब. घरात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार. मुलगा अंकुश बच्छे याची चार महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या अग्निवीर भरतीत निवड झाली. तो प्रशिक्षणासाठी बेळगाव येथे गेला आहे.
मुलगा नोकरीला लागल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. त्यातच दिनांक २० रोजी सकाळी राजेंद्र यांच्या पत्नी छायाबाई बच्छे यांची अचानक तब्येत बिघडली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. इकडे परिवार दुःखी असतानाही राजेंद्र बच्छे, भाऊ गुलाब बच्छे व कुटुंबातील सदस्यांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. मुलगा सैनिकी प्रशिक्षणाला बेळगाव येथे असल्याने आईच्या अंत्यविधीसाठी येऊ शकला नाही. त्यामुळे मुलगी रोहिणी बच्छे हिने आईला अग्निडाग दिला.