जळगावमधील उद्धव सेनेचे इच्छुक मुंबईत ठाण मांडून, मविआच्या जागांचा फैसला होईना...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 01:02 PM2024-10-22T13:02:43+5:302024-10-22T13:03:58+5:30

Maharashtra Assembly Election 2024 And Jalgaon Assembly constituency : जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातून मविआकडून इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. सोमवारी जळगाव जिल्ह्यातील उद्धव सेनेचे इच्छुक मुंबईत ठाण मांडून होते.

maharashtra assembly election 2024 Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Jalgaon Assembly constituency | जळगावमधील उद्धव सेनेचे इच्छुक मुंबईत ठाण मांडून, मविआच्या जागांचा फैसला होईना...

जळगावमधील उद्धव सेनेचे इच्छुक मुंबईत ठाण मांडून, मविआच्या जागांचा फैसला होईना...

जळगाव - महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचे चित्र स्पष्ट झाले नसल्याने जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातून मविआकडून इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. सोमवारी जळगाव जिल्ह्यातील उद्धव सेनेचे इच्छुक मुंबईत ठाण मांडून होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत जागा वाटपाचा कोणताही निर्णय झालेला नव्हता. 

रविवारपर्यंत एरंडोल व जळगाव ग्रामीण या दोन जागांवर पेच कायम होता. मात्र, सोमवारी या जागांवर चर्चा होऊन शरद पवार गटाकडे या जागा जाण्याची शक्यता अधिक असल्याचे मविआच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. उद्धव सेनेच्या जळगाव ग्रामीण, एरंडोल व चाळीसगाव या मतदारसंघातील इच्छुकांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तर सोमवारी जळगाव शहरातील उद्धव सेनेच्या काही इच्छुकांनी शरद पवार यांची भेट घेतली. यासह रविवारी उद्धव सेनेकडून जळगाव शहरातून इच्छुक असलेल्या एका नेत्याने शरद पवार यांची भेट घेतली होती. 

विश्वसनीय नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार 

• जळगाव शहर - या मतदारसंघाबाबत सोमवारी सायंकाळपर्यंत कोणताही निर्णय होऊ शकला नव्हता. 
• जळगाव ग्रामीण - या जागेसाठी उद्धव सेना व शरद पवार गटाकडून आग्रह होता. त्यात ही जागा शरद पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. 
• पाचोरा - ही जागा उद्धव सेनेच्या वाट्याला गेली असून, अधिकृत घोषणा मंगळवारी होण्याची शक्यता आहे. 
• एरंडोल - या जागेवरदेखील पेच सुरु होता. मात्र, ही जागा शरद पवार गटाकडे गेली आहे. 
• चाळीसगाव - या जागेवरदेखील पेच कायम आहे. शरद पवार गट व उद्धव सेना या जागेसाठी आग्रही आहे. 
• अमळनेर - या जागेबाबतही उशिरापर्यंत निर्णय झालेला नव्हता. काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटात पेस सुरू होता. 
• भुसावळ - या जागेसाठी पेच नाही. मात्र, निर्णय देखील घेण्यात आलेला नव्हता. 
• चोपड़ा - ही जागा शरद पवार गटाकडे गेली असल्याचे मविआच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. 
• मुक्ताईनगर - या जागेसाठी केवळ शरद पवार गटाकडूनच आग्रह होता. त्यानुसार ती जागा या गटाकडेच गेली आहे. 
• जामनेर - या जागेबाबतदेखील अधिकृत निर्णय होऊ शकलेला नाही. मंगळवारी होणाऱ्या घोषणेनंतरच या जागेचा सस्पेन्स उघडेल. 
• रावेर - या जागेवर विद्यमान आमदार कॉंग्रेसचे असल्याने ही जागा काँग्रेसच्या खात्यात जाण्याची शक्यता मविआच्या नेत्यांनी व्यक्त केली. 

जागा वाटपाचा निर्णय महाविकास आघाडीचे वरिष्ट नेते घेणार आहेत. अद्याप अधिकृतरित्या कोणत्याही जागेची घोषणा झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत काहीही सांगता येणार नाही. 
- प्रमोद पाटील, जिल्हाध्यक्ष, शरद पवार गट झालेला नव्हता. 

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जळगाव ग्रामीण, एरंडोल व चाळीसगाव येथील पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा केली आहे. आम्ही त्या जागांवर आग्रही आहोत. शेवटी निर्णय मविआचे वरिष्ट नेते घेतील. 
-विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख, उद्धवसेना 
 

Web Title: maharashtra assembly election 2024 Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Jalgaon Assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.