जळगावमध्ये जागा वाटपातील बेरजेत शिंदे सेना व उद्धव सेना सरस

By Ajay.patil | Published: October 28, 2024 02:33 PM2024-10-28T14:33:41+5:302024-10-28T14:36:11+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : जळगाव जिल्ह्यातील ११ जागांवरील बेरजेच्या राजकारणात महायुतीत शिंदेसेना तर महाविकास आघाडीत उद्धव सेना सरस ठरली आहे. 

Maharashtra Assembly Election 2024 Shivsena Eknath Shinde Uddhav Thackeray jalgaon Assembly constituency Politics | जळगावमध्ये जागा वाटपातील बेरजेत शिंदे सेना व उद्धव सेना सरस

जळगावमध्ये जागा वाटपातील बेरजेत शिंदे सेना व उद्धव सेना सरस

जळगाव : राज्यात महायुतीत भाजप सर्वाधिक तर महाविकास आघाडीत सर्व पक्षांनी समसमान आगा घेतल्या आहेत. मात्र, जळगाव जिल्ह्यातील ११ जागांवरील बेरजेच्या राजकारणात महायुतीत शिंदेसेना तर महाविकास आघाडीत उद्धव सेना सरस ठरली आहे. 

महायुतीमध्ये शिंदेसेनेने ५ तर महाविकास आघाडीत उद्धव सेनेला ४ जागा मिळाल्या आहेत. 

२०१९ च्या तुलनेतील जागा वाटपाचे गणित पाहिले तर महायुतीत एकसंध शिवसेनेने ४ जागा लढविल्या होत्या, तर या निवडणुकीत शिंदेसेना ५ जागा लढत आहे. 

तर दुसरीकडे उद्धव सेनेने २०१९ च्या गणितानुसार आपल्या ४ जागा कायम ठेवल्या आहेत. त्यामुळे जागा वाटपाच्या गणितात उद्धव, शिदिसेना महायुती व महाविकास आघाडीत वरचढ ठरली आहे. त्यातुलनेत राष्ट्रवादी शरद पवार गटाला मात्र नुकसान सहन करावे लागले आहे. 

भाजपने २ तर शरद पवार गटाने गमावल्या ५ जागा... 

यंदाच्या जागा वाटपात महायुतीत भाजपच्या २०१९ च्या तुलनेत २ जागा कमी झाल्या आहेत. भाजपने २०१९ च्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून सात जागा लढविल्या होत्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला पाच जागा आल्या आहेत. त्यात मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात १९९० नंतर पहिल्यांदाच विधानसभेत भाजपचे उमेदवार रिंगणात राहणार नाहीत. तर अमळनेर मतदारसंघातदेखील यंदा भाजपचा उमेदवार रिंगणात राहणार नाही.

२०१९ च्या निवडणुकीत एकसंध असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीत ११ पैकी नऊ जागा लढविल्या होत्या. तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराला पाठींबा दिला होता. मात्र, यंदा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला केवळ चार जागा आल्या आहेत. २०१९ च्या तुलनेत राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाच जागांवर पाणी फेरावे लागले आहे. 

काँग्रेस दोन जागांच्या फायद्यात तर अजित पवार गटाला केवळ एक जागा... 

काँग्रेसला मात्र जिल्ह्यातील जागा वाटपात दोन जागांचा फायदा झाला आहे. २०१९ मध्ये काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली होती. यंदा मात्र काँग्रेसला भुसावळ व अमळनेरची जागा मिळाली आहे. तर दुसरीकडे महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला केवळ एक जागा मिळाली आहे. 

कोणत्या जागा वाढल्या कोणत्या झाल्या कमी..... 

शिंदेसेनेने जागा वाटपात पाचोरा, एरंडोल, चोपडा, जळगाव ग्रामीण या जागा कायम ठेवल्या. तर मुक्त्ताईनगरची जागा नव्याने मिळविली आहे. 

भाजपने २०१९ च्या तुलनेतील ७ जागांपैकी जळगाव शहर, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, रावेर या जागा कायम ठेवल्या. तर अमळनेर व मुक्ताईनगरची जागा मित्रपक्षांना सोडली. 

काँग्रेसला २०१९ मध्ये रावेरची जागा मिळाली होती, यंदा मात्र अमळनेर व भुसावळ या दोन आगा काँग्रेसने जागा वाटपात मिळवल्या आहेत. 

दुभंगलेल्या पक्षांचे चित्र 

अजित पवार गटाचा एकसंध राष्ट्रवादीसोबत तुलना केली तर तब्बल ८ जागा अजित पवार गटाने गमाविल्या. तर केवळ एक जागा कायम ठेवली. 

जागा वाटपात सर्वाधिक नुकसान हे राष्ट्रवादी शरद पवार गटाला झाले आहे. २०१९ मध्ये ९ जागा लढल्या होत्या. त्यापैकी ४ जागा मिळाल्या आहेत. तर ५ जागांवर पाणी सोडले आहे. यामध्ये चाळीसगाव, चोपडा, अमळनेर, भुसावळ व पाचोयाच्या जागेचा समावेश आहे. 

उद्धव सेनेची एकसंध शिवसेनेसोबत तुलना केली. तर २०१९ प्रमाणे यंदाच्या निवडणुकीत आपल्या जागा कायम ठेवल्या आहेत. मात्र, काही जागा फेरफार केल्या आहेत. त्यात जळगाव ग्रामीण ऐवजी जळगाव शहर तर एरंडोल ऐवजी चाळीसगावची जागा उद्धव सेनेने पदरात पाडली आहे. 
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Shivsena Eknath Shinde Uddhav Thackeray jalgaon Assembly constituency Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.