'मी गद्दारी केली असेल तर गोळी घाला, जोड्याने मारा; पण तुम्हीही युतीधर्म पाळा!'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 11:42 AM2019-10-14T11:42:09+5:302019-10-14T11:44:37+5:30

Maharashtra Election 2019: गुलाबराव यांच्या मनातील राग त्यांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होत होता.

Maharashtra Election 2019: Word war between Gulabrao Patil and Girish Mahajan over rebels in Jalgaon | 'मी गद्दारी केली असेल तर गोळी घाला, जोड्याने मारा; पण तुम्हीही युतीधर्म पाळा!'

'मी गद्दारी केली असेल तर गोळी घाला, जोड्याने मारा; पण तुम्हीही युतीधर्म पाळा!'

googlenewsNext
ठळक मुद्देदगाबाजी खपवून घेणार नाही, असा इशाराच गुलाबराव पाटील यांनी यावेळी गिरीश महाजनांना दिला. भाजपाचे बंडखोर 'भाजपाचे अधिकृत बंडखोर उमेदवार' म्हणून फलक मिरवत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात बंडखोरांना दुर्लक्षित करण्याचं आवाहन केलं.

जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेदवारांविरुद्ध भाजपाचे बंडखोर उमेदवार उभे असल्याने त्यांच्यावरील कारवाईच्या मुद्यावरून जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे धडाकेबाज नेते गुलाबराव पाटील यांच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळीच रविवारी खटके उडाले. गुलाबराव यांच्या मनातील राग त्यांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होत होता. दगाबाजी खपवून घेणार नाही, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. 

भाजपाचे बंडखोर 'भाजपाचे अधिकृत बंडखोर उमेदवार' म्हणून फलक मिरवत आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही. लोकसभेला तुम्ही दोन वेळा उमेदवार बदलला तरी आम्ही तुमच्या पाठीशी कायम राहिले. त्याचे हेच फळ आहे का?, असा रोखठोक सवाल गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजनांना केला. भाजपाने बंडखोर आमदारांवर कारवाई करावी, असं पत्र स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. तरीही कारवाई होत नाही. युतीसाठी हे योग्य नाही. आम्ही बंडखोरी केली असेल, गद्दारी केली असेल तर मला गोळी मारा. जोड्याने मारा. आम्ही पाच वर्षं जनतेची कामे यासाठीच करतो का? तुम्ही आमची कारकीर्दच संपवायला निघाले, अशा तीव्र भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

नेमकं प्रकरण काय?

जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे चार उमेदवार उभे आहेत. जळगाव ग्रामीण, पाचोरा, एरंडोल आणि चोपडा या ठिकाणी शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. त्यापैकी भाजपाकडून केवळ अमोल शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याबद्दल आपणास पंतप्रधान मोदी यांच्यासमोर व्यथा मांडण्याची संधी मिळावी, असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांना केलं. मात्र तसं करता येणार नाही, असं महाजन यांनी सांगताच, दोघांमध्ये वाद सुरू झाला. सगळ्या वाहिन्यांचे कॅमेरे आणि छायाचित्रकार तो टिपत होते. त्यातही गुलाबरावांचा संताप स्पष्ट दिसतो आहे.  

काय म्हणाले मुख्यमंत्री?

या सगळ्या प्रकरणानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात बंडखोरांना दुर्लक्षित करण्याचं आवाहन मतदारांना केलं. बंडखोरी करणाऱ्यांना कुणाचाही आशीर्वाद नाही, त्यामुळे पक्षचिन्ह असलेल्या उमेदवारांनाच निवडून द्या, असं त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, गिरीश महाजन यांच्यासोबतच्या शाब्दिक चकमकीनंतर गुलाबराव पाटील हे व्यासपीठावर न जाता समोर श्रोत्यांच्या खुर्चीवर बसले. अखेर श्रीराम खटाडे यांनी गिरीश महाजन व गुलाबरावांशी चर्चा करत समजूत घातली. त्यानंतर पाटील व्यासपीठावर गेले. शिवसेनेचे सर्वच उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते. 

Web Title: Maharashtra Election 2019: Word war between Gulabrao Patil and Girish Mahajan over rebels in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.