उद्धवसेना आणि पवार गट लवकरच काँग्रेसमध्ये विलिन होणार ! देवेंद्र फडणवीस यांचे भाकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 04:54 PM2024-05-08T16:54:09+5:302024-05-08T16:54:51+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: इंडिया आघाडीची ना नेता, ना नियत, ना नीती अशी स्थिती आहे. येत्या काही दिवसात उद्धवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे भाकित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पाचोरा येथे केले.
- श्यामकांत सराफ
जळगाव - इंडिया आघाडीची ना नेता, ना नियत, ना नीती अशी स्थिती आहे. येत्या काही दिवसात उद्धवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे भाकित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पाचोरा येथे केले. आपले तिकिट का कापले याचे आत्मचिंतन करावे, असा टोला त्यांनी माजी खासदार उन्मेष पाटील यांना मारला.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाचोरा येथील कैला माता मंदिराशेजारी असलेल्या पटांगणावर बुधवारी भर दुपारी सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, इंडिया आघाडी म्हणजे नेता, नियत आणि नीती नसलेली आघाडी आहे. यांच्यात कुणीही पंतप्रधान पदाचे नेतृत्व करण्यासारखे नाही. आघाडीतील प्रत्येक जण स्वतःला पंतप्रधान पदाचे नेते समजतात त्यांच्या इंजिनमध्ये फक्त नेतेच आहेत, तिथे जनतेला बसण्यास जागा नाही. आघाडीतील नेत्यांना कन्व्हीन्सही करता येत नाही म्हणून ते जनतेला कन्फ्युज करत असल्याची टीका त्यांनी केली.
निवडणुकीनंतर सगळे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे शरद पवार म्हटले आहे. आता तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धवसेना लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे भाकीत फडणवीस यांनी केले.