महाराष्ट्र बंद : चाळीसगावात 'बंद'मुळे शाळांमध्ये शुकशुकाट, बसफे-याही रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 12:10 PM2018-01-03T12:10:40+5:302018-01-03T12:11:05+5:30
भीमा-कोरगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला बुधवारी सकाळपासूनच चाळीसगावात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळात आहे.
चाळीसगाव (जळगाव) - भीमा-कोरगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला बुधवारी सकाळपासूनच चाळीसगावात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळात आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठांसह शाळा, महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट आहे. मंगळवारी सायंकाळी पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या बसफे-या बुधवारी मात्र थांबवण्यात आल्या आहेत. तुरळक वर्दळ वगळता पूर्ण शहरात बंद पाळण्यात येत आहे.
बुधवारी बंदची हाक दिल्याने सकाळ विभागातील शाळांमध्ये अत्यल्प विद्यार्थी आलेत. ग्रामीण भागातून येणा-या विद्यार्थ्यांना प्रवास साधने उपलब्ध नसल्याने बस स्थानकातही शांतता दिसून आली. शहरातील सिग्नल चौक, मुख्य बाजारपेठ, बसस्थानक, स्टेशन रोड, भडगाव रोड, औरंगाबाद रोड वरील दुकाने बंद होती. भाजीपाला बाजारात सकाळी तुरळक लिलाव झाले. ग्रामीण भागातून येणारा भाजीपाला बंदमुळे बाजार समितीत आला नाही. काही प्रमाणात स्कूल बसही बंदच होत्या. शहराच्या मध्यवर्ती भागात असणा-या प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालये, बालकमंदिरे, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी न आल्याने शुकशुकाट होता.
ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला असून खबरादारीच्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत. प्रशासनही अर्लट करण्यात आले आहे. जनतेने कोणत्याही अफवांना बळी न पडता बंद मध्ये शांततेने सहभागी व्हावे, असे आवाहन बंद पुकारणा-या संघटनांनी केले आहे.