Vidhan Sabha 2019: भाजप उमेदवारीबाबत दोन जागांवर कमालीची उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 04:01 AM2019-09-23T04:01:21+5:302019-09-23T04:01:34+5:30
चाळीसगावला इच्छुकांची लांबलचक रांग
जळगाव : भाजपचे जिल्ह्यात ६ आमदार असून अमळनेरचे अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांचेही भाजपलाच समर्थन आहे. ७ जागांवर बहुतांश ठिकाणी विद्यमान आमदार हेच उमेदवार असल्याचे संकेत असले तरी चाळीसगाव आणि अमळनेर येथे अनिश्चितता असल्याने तेथील उमेदवारीवर सर्वांचे लक्ष आहे.
जळगाव, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर येथे भाजप उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा दौऱ्यात विद्यमान आमदारांची नावे घेवून समर्थन द्याल का? असा प्रश्न विचारत त्यांंच्या उमेदवारीचे संकेत दिले. मात्र अमळनेर येथे भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ आणि अमळनेरचे अपक्ष आमदार शिरीष चौधरी या दोघांच्याही नावाचा उल्लेख करुन संभ्रम कायम ठेवला. चाळीसगाव येथील आमदार उन्मेष पाटील हे खासदार झाल्याने साहजिकच तेथे अन्य उमेदवार द्यावा लागणार आहे. तेथे इच्छुकांची मोठी रांग आहे.