महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून रुग्णांसाठी कोट्यवधींचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 07:54 AM2017-08-15T07:54:25+5:302017-08-15T07:54:30+5:30
जळगावात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना : जळगाव जिल्ह्यातील ६२ हजार रुग्णांचे १२७ कोटी अदा
विलास बारी/जळगाव, दि. 15 - गोरगरीब रुग्णांना चांगल्या प्रकारे उपचार घेता यावे यासाठी शासनाने सुरू केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत राज्यातील १२ लाख ७५ हजार १५८ रुग्णांवरील शस्त्रक्रियेवर २८६० कोटी ७३ लाख ५४ हजार १८१ रुपयांचा निधी राज्य शासनातर्फे खर्च करण्यात आला आहे.
गरिबांना असलेल्या दुर्धर आजारावर उपचार करता यावे यासाठी राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शुभ्र कार्ड वगळता केशरी, पिवळे व अंत्योदय कार्डधारक कुटुंबातील सदस्यांना असलेल्या आजारावर शासनाने राज्यभरात नियुक्त केलेल्या ४८४ रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. त्यात ९७१ आजारांवर उपचार करण्यात येत असतात.
फसवणूक टाळण्यासाठी चित्रीकरण
गतकाळात काही रुग्णालयांमध्ये बोगस रुग्ण दाखवून रक्कम वसूल करण्यात आल्यानंतर शासनाने ज्या रुग्णांवर उपचार केले त्याचे चित्रीकरण करणे बंधनकारक केले आहे. तसेच रुग्ण दाखल झाल्यानंतर दोन तासात मुंबई येथील कार्यालयाकडून उपचाराची परवानगी मिळणे क्रमप्राप्त आहे. रुग्णालयांकडून उपचारावरील खर्च अवाच्या सवा लावण्यात येऊ नये यासाठी आजारावर उपचारासाठीची राज्य आरोग्य हमी सोसायटीतर्फे रक्कम ठरवून दिली आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हॉस्पिटलला रुग्णाच्या जेवणासह डिस्चार्ज दिल्यानंतर घरी जाण्यासाठी प्रवासखर्चदेखील बंधनकारक करण्यात आला आहे.
१२ लाख ७५ हजार रुग्णांवर २८६० कोटींचे उपचार
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत राज्यभरातील १४ लाख २६ हजार २६२ रुग्णांनी उपचारासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे पूर्व परवानगी मागितली होती. त्यानुसार १४ लाख १४ हजार ८६८ रुग्णांना परवानगी देऊन १२ लाख ७५ हजार १५८ रुग्णांवर शस्त्रक्रिया करून २८६० कोटी ७३ लाख ५४ हजार १८१ रुपयांची रक्कम अदा करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील ६७ हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया
जळगाव जिल्ह्यातील ३८ लाख नागरिक उपचारासाठी पात्र ठरलेले आहेत. जिल्हा रुग्णालयासह १८ खासगी रुग्णालयांमध्ये ही योजना सुरू आहे. त्यात आतापर्यंत ६६ हजार ९९७ रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यापैकी ६१ हजार ९१५ रुग्णांच्या शस्त्रक्रियेची १२७ कोटी २६ लाख ७० हजार ३७२ रुपयांची रक्कम राज्य आरोग्य हमी सोसायटीतर्फे रुग्णालयांना अदा केली आहे.
शुभ्र कार्ड वगळता अन्य रेशन कार्डधारक या योजनेसाठी पात्र ठरतात. रुग्णांना तत्काळ उपचार व योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी या योजनेचा लाभ देण्यात येणाºया प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आरोग्यमित्र नियुक्त केलेला असतो. अनेक रुग्णांचे रेशन कार्डवर व आधार कार्डवर वेगवेगळे आडनाव असतात. त्या वेळी उपचाराला विलंब होतो. दोन्ही कागदपत्रांवर एकच आडनाव असल्यास तत्काळ उपचार मिळतात. जळगाव जिल्ह्यातील ६१ हजार ९१५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करीत १२७ कोटी २६ लाख ७० हजार ३७२ रुपयांचे मोफत उपचार करण्यात आले. -डॉ. चेतन पाटील, जिल्हा समन्वयक, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, जळगाव.