जळगाव जिल्ह्यातील तीन रुग्णालयांमधील ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:15 PM2018-12-26T12:15:39+5:302018-12-26T12:16:01+5:30

एक रुग्णालय स्वत: योजनेतून पडले बाहेर

The 'Mahatma Phule Janarogya Yojana' has been closed in three hospitals in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यातील तीन रुग्णालयांमधील ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ बंद

जळगाव जिल्ह्यातील तीन रुग्णालयांमधील ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ बंद

Next
ठळक मुद्देएक रुग्णालय बंद तर एकाची जागा बदलल्याने पुन्हा प्रक्रिया

जळगाव : रुग्णांच्या विविध प्रकारच्या तपासण्या, उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी दीड लाख रुपयांचा विमा लाभ देण्याच्या उद्देशाने सुरू असलेली ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना’ जळगाव जिल्ह्यातील तीन रुग्णालयांमध्ये बंद झाली आहे. यात गणपती हॉस्पिटल स्वत:हून या योजनेतून बाहेर पडले आहे तर भुसावळ येथील कोणार्क हॉस्पिटल बंद करण्यात आले असून इण्डो अमेरिकन हॉस्पिटलची जागा बदलल्याने तेथे ही योजना पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
२०१२ मध्ये राज्य सरकारने नागरिकांना आरोग्याशी संबंधित ९७१ प्रकारच्या तपासण्या, उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी दीड लाख रुपयांपर्यंतचा विमा लाभ देण्याच्या उद्देशाने जनआरोग्य योजना सुरू केली. या योजनेला वेगवेगळे नाव देण्यात आले. सध्या ही योजना ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना’ या नावाने सुरू आहे. या ‘कॅशलेस’ विमा योजनेंतर्गत गरजू रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी विविध जिल्ह्यांतील काही रुग्णालये संलग्न करण्यात आले.
संलग्न रुग्णालयांनी २५ टक्के खाटा (बेड्स) या योजनेतील रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक असतानाही काही रुग्णालयांनी त्या ठिकाणी अन्य रुग्णांना ठेवल्याची तक्रारी आल्याने राज्यातील अनेक रुग्णालयांना या योजनेतून वगळण्यात आले असल्याचे माहिती समोर आली.
या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील स्थिती जाणून घेतली असता जिल्ह्यातील तीन रुग्णालयांमध्ये ही योजना बंद आहे. मात्र यात जळगाव शहरातील गणपती हॉस्पिटल स्वत:हून बाहेर पडल्याची माहिती मिळाली. या बाबत डॉ. शीतल ओस्वाल यांनी सांगितले की, रुग्णालयात इतर योजना सुरू असून प्रत्येक योजनांमधील रुग्णांची वाढती संख्या पाहता आपण स्वत:हून रितसर पत्र देऊन महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून बाहेर पडलो आहे.
या शिवाय जळगावातील इंडो अमेरिकन हॉस्पिटलची जागा बदलली असून नवीन जागेत ही योजना सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विकास बोरोले यांनी सांगितले. यासाठी लेखा परीक्षणही झाले असून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर अखेर अथवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात योजना पुन्हा सुरू होणार असल्याचेही डॉ. बोरोले म्हणाले.
भुसावळ येथील कोणार्क हॉस्पिटलचाही यात समावेश असून हे हॉस्पिटल बंद करण्यात आले असल्याची माहिती डॉ. विकास बोरोले यांनी दिली.
विमा कंपन्यांशी असतो रुग्णालयांचा करार
संबंधित योजनेत संलग्न असलेल्या रुग्णालयांचा सरकारशी करार नसतो तर तो विमा कंपनीशी असतो. त्यामुळे कोणत्या रुग्णालयांना योजनेतून वगळले किंवा कायम ठेवले या बाबत सरकार पत्रक अथवा आदेश काढू शकत नाही, अशी माहिती मिळाली. इतकेच नव्हे याबाबत सर्व प्रक्रिया मुंबई येथून होते, जिल्हा स्तरावर केवळ योजनेचे समन्वयक असतात.


रुग्णालयात इतर योजना सुरू असून प्रत्येक योजनांमधील रुग्णांची वाढती संख्या पाहता आपण स्वत:हून रितसर पत्र देऊन महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून बाहेर पडलो आहे.
- डॉ. शीतल ओस्वाल, गणपती हॉस्पिटल.

इंडो अमेरिकन हॉस्पिटलची जागा बदलली असून नवीन जागेत ही योजना सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू असून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर अखेर अथवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात योजना पुन्हा सुरू होईल. तसेच कोणार्क हॉस्पिटल बंद करण्यात आले आहे.
- डॉ. विकास बोरोले, व्यवस्थापकीय संचालक, इंडो अमेरिकन हॉस्पिटल

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची सर्व प्रक्रिया मुंबई येथून होते. योजनेतून कोणत्या रुग्णालयांना वगळले अथवा योजना बंद केली या बाबत सरकार पत्रक अथवा आदेश काढत नाही.
- चेतन पाटील, समन्वयक, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना.

Web Title: The 'Mahatma Phule Janarogya Yojana' has been closed in three hospitals in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.