"महाविकास आघाडी सरकारचेही आता विसर्जन व्हावे, ही तर जनतेच्या मनातील इच्छा", गिरीश महाजन यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 10:19 PM2021-09-19T22:19:52+5:302021-09-19T22:20:39+5:30
Girish Mahajan News: जनतेचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी असे सर्वांचेच प्रश्न कायम आहेत. महाविकास आघाडी सरकारला सर्वच घटक कंटाळले आहेत.
जळगाव - महाविकास आघाडी सरकारचेही आता विसर्जन व्हावे, ही ही आमची नव्हे तर जनतेच्या मनातील इच्छा आहे, अशी टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी जळगावात राज्य सरकारवर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कोरोना लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी गिरीश महाजन हे रविवारी सायंकाळी जळगावात आले होते, त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. ("Mahavikas Aghadi government should be dissolved now, this is the desire of the people," said Girish Mahajan )
राज्यावर अतिशय दुर्दैवी वेळ
राज्याच्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारचे विसर्जन व्हावे, हे सरकार पायउतार व्हावे, असे आमच्यापेक्षा जनतेलाच वाटतं आहे. राज्यातील जनता त्रस्त झाल्याचे आज आपण सर्वजण बघत आहोत. जनतेचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी असे सर्वांचेच प्रश्न कायम आहेत. महाविकास आघाडी सरकारला सर्वच घटक कंटाळले आहेत. आज जी वेळ राज्यावर आली आहे, ती कधीही आलेली नव्हती. अतिशय दुर्दैवी वेळ या सरकारने आणली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भाजप सरकार आल्यास सर्वांना न्याय
राज्यात आता बदल झाला पाहिजे, हे जनतेच्याच मनात आहे. हे सरकार जाऊन भाजप सरकार आले तर सर्वांना न्याय मिळेल. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून भूमिका निभावत आहोत. आमचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर हे राज्यभर दौरा करत आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सक्षम विरोधी पक्ष म्हणून पूर्णपणे माप देण्याचे काम आम्ही करतोय, असेही गिरीश महाजन यावेळी बोलताना म्हणाले.