विनोद चांदणे प्रकरणात शेळगावचा महेंद्र राजपूत मास्टरमाइंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:00 AM2019-04-01T00:00:43+5:302019-04-01T00:00:54+5:30
घटनेत वापरण्यात आलेली कार शेळगाव येथून जप्त
पहूर, ता. जामनेर : ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे यांच्या खून प्रकरणात ‘मास्टर माईंड तळेगाव, ता. जामनेर येथील महेंद्र राजपूत हा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून आरोपींची संख्या आता सहावर पोहचली आहे. दरम्यान, विनोद चांदणे यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घटनेत वापरण्यात आलेली कार पोलिसांनी शेळगाव येथून जप्त केली आहे.
विनोद चांदणे यांचे १९ मार्च रोजी अपहरण करून खून करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार प्रदीप परदेशी नसून तळेगावचा महेंद्र असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अनेक धक्कादायक रहस्य बाहेर येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणात अटकेत असलेल्या चंद्रशेखर वाणी, महेंद्र राजपूत, विनोद देशमुख व नामदार तडवी यांची १ एप्रिल रोजी पोलीस कोठडी संपत आहे.
पडद्यामागील सूत्रधार प्रदीपच्या अटकेनंतर निष्पन्न
या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून प्रदीप संतोष परदेशी, रा. डांभूर्णी ता.पाचोरा याचे नाव महेंद्र राजपूतकडून तपासात निष्पन्न झाले. प्रदीप हाच मुख्य सुत्रधार असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते. ३०मार्च रोजी परदेशी नाशिकमध्ये असल्याचे समजताच सापळा रचून पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, पोलीस कर्मचारी अनिल देवरे व दिनेश मारवळ यांनी रात्री ताब्यात घेऊन पहूर पोलीस स्टेशनमध्ये रविवारी पहाटे हजर करून पूर्ण तपासाअंती अटक केली. तसेच तपासादरम्यान योगेश श्रावण सोनार, रा. नगरखाना. जामनेर याचे नाव समोर आले आहे. यालाही पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली आहे. विशेष म्हणजे घटनेचा मूख्य सुत्रधार प्रदीप नसून महेंद्र राजपूत असल्याचा गौप्यस्फोट खुद्द प्रदीपने पोलीस तपासात केला आहे. तपासात पुन्हा काही जणांचे नाव समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घटनेतील बडा मासा गळाला लागण्यासाठी पोलीस तपासात गोपनियता बाळगत असल्याचे सांगितले आहे. घटनेच्या मागचे ठोस कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.
तीन दिवसांपासून मागावर
मास्टरमाईंड महेंद्र राजपूत याने प्रदीप परदेशी, योगेश सोनार यांना फोन लावून तीन दिवस अगोदर बोलावून घेतले होते. ते १६ मार्च पासून विनोदच्या मागावर होते. १९ रोजी विनोद घरून निघाल्यानंतर महेंद्रची चारचाकी विनोदच्या दुचाकीला आडवी लावून सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास तिघांनी विनोदला वाकडी धरणाच्या भिंतीजवळ नेले व लोखंडी रॉडने डोक्यावर वार केले. त्यानंतर पाचोरा तालुक्यातील मोहाडी धरणाच्या जवळ असलेल्या रमेश रामसिंग पाटील यांच्या शेतातील विहिरी जवळ दुपारी दीड वाजेच्या सुमारास विनोदला गंभीर अवस्थेत आणून त्याला पुन्हा बेदम मारहाण करून खून केल्याचे माहिती समोर आली. हात-पाय बांधून व दोन दगड बांधून मृतदेह विहिरीत टाकून व घटनास्थळावरून पळ काढला, अशीही माहिती प्रदीपच्या अटकेनंतर तपासात समजली. महेंद्र हा मुळचा कासमपुरा येथील रहिवासी असून प्रदीप परदेशी याच्याशी त्याची जुनी ओळख आहे. त्यामुळे दहा दिवसानंतर मुख्य सुत्रधार महेंद्र राजपूत असल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनाही त्याने तपासात चकवा दिला आहे.
दोषींना पाठबळ देऊ नये
वाकडीतील घटना अतीशय निंदनीय असून जातीय वादाला खतपाणी घालण्याचे काम सुरू असून स्थानिक राजकीय नेत्याने दोषींना पाठबळ देऊ नये. वारंवार मागासवर्गीय समाजावर अन्याय होत असल्याने राज्यस्तरावर येत्या काळात आंदोलन उभारू तसेच पीडित कुंटुबाला कोणताही आधार नसल्याने शासनाने त्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी मागणी अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी चांदणे कुटुंबाचे सांत्वन करून पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करताना केली.
नागरी हक्क सरंक्षण आयुक्तांची भेट
नागरी हक्क सरंक्षण नाशिकचे आयुक्त विजय मगरे यांनी चांदणे कुटुंबाची व पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने शासनाच्या निकषांनुसार तीन टप्प्यात आर्थिक मदत पीडित कुंटुबाला भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
घटना स्थळी महेंद्र राजपूत कडून माहिती
डीवाय.एसपी ईश्वर कातकडे यांनी मुख्य सुत्रधार महेंद्र राजपूत याला रविवारी वाकडी धरणाच्या जवळील घटनास्थळी नेऊन अधिक माहिती जाणून घेतली आहे. तसेच डोक्यावर वार केलेला लोखंडी रॉळ धरणात फेकल्याची कबुली महेंद्रने दिलीे. त्यादृष्टीने धरणावर जावून पाहणी करणार असून लोखंडी रॉड ताब्यात घेणार असल्याचे सांगण्यात आले.
गोदामातून कार जप्त
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात आलेली कार पोलिसांनी महेंद्र राजपूत याच्या शेळगावातील घरी जावून गोदामामधून जप्त केलीे. कारमध्ये पडलेल्या विनोदच्या रक्ताचे नमुने फॉरेंन्सिक लॅबच्या पथकाने घेतले.