महिला शक्ती साथ देईल आणि महायुतीचे सरकार आणतील; PM मोदींनी फुंकले विधानसभेचे रणशिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 05:52 AM2024-08-26T05:52:25+5:302024-08-26T05:53:01+5:30
विरोधकांचे सात दशक आणि आमचे दहा वर्षांचे काम तोलून पाहा, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
विलास बारी/कुंदन पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : मातृशक्तीने नेहमीच देशाला प्रेरणा दिली आहे. समाजालाही मोठे देणं दिलं आहे. म्हणूनच देशाची तिसरी आर्थिक शक्ती मजबुतीच्या मार्गावर आहे. या स्त्रीशक्तीच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची केंद्र शासनाची भूमिका आहे. मात्र त्याच मातृशक्तीवर कुणी अत्याचार करत असेल तर ते अक्षम्य पाप आहे. म्हणून देशातील विविध राजकीय पक्ष तसेच सत्ताकेंद्रांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा हिशेब घ्यावा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षांना आवाहन केले. बदलापूरसह कोलकाता घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हा इशारा दिला आहे.
जळगाव येथे रविवारी आयोजित लखपती दीदींच्या देशव्यापी मेळाव्यात ते बोलत होते. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह केंद्र व राज्य सरकारमधील मंत्री यावेळी उपस्थित होते. मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. श्रीकृष्ण जयंतीनिमित्ताने आजच शुभेच्छा देतो, असे सांगत त्यांनी नेपाळच्या दुर्घटनेतील मयत भाविकांना श्रद्धांजली अर्पण केली. मयत भाविकांच्या कुटुंबीयांसोबत केंद्र व राज्य शासन खंबीरपणे उभे राहील, असे ते म्हणाले.
काँग्रेसवर टीका, फुंकले रणशिंग
गेल्या दोन महिन्यांत ११ लाख महिला लखपती झाल्या. त्यात महाराष्ट्रातील एक लाख दीदींचा समावेश आहे. जेव्हा महिला कमावती होते तेव्हा तिचा सन्मान वाढतो. या मातृशक्त्तीसाठी निर्णय घेतल्यावर आर्थिक घडी विस्कटेल, असे विरोधक म्हणाले. मात्र, महिलाशक्ती विश्वासाला पात्र ठरली. विरोधकांचे सात दशक आणि आमचे दहा वर्षांचे काम तोलून पाहा, असे मोदी म्हणाले. गेल्या दहा वर्षांत आमच्या सरकारने तब्बल नऊ लाख कोटींची मदत उपलब्ध केली आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकारही त्यात चकाकता तारा आहे. महाराष्ट्रात उद्योगांना प्रोत्साहन देण्याची भूमिका हाती घेतली आहे. हीच महिला शक्ती साथ देईल आणि महायुतीचे शासन सत्तेवर आणतील, असा विश्वास व्यक्त करीत मोदींनी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले.
तपास वेगाने करा, शिक्षा ठोठवा
मातृशक्तीचे सामर्थ्य वाढविताना त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची आपली भूमिका आहे. सत्ता येईल. सत्ता जाईल. मात्र महिलांवर अत्याचार करणारे वाचायला नकोत. त्यादृष्टीने न्याय व्यवस्थेत कठोर बदल करीत आहे. त्यादृष्टीने सर्वच राज्यांनी गंभीर भूमिका घ्यावी, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.
२ लाख पशुपालक सखींना प्रशिक्षण
आधुनिक आणि प्रयोगशील शेती करण्यासाठी देशभरात दोन लाख पशुपालक सखींना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. तसेच, शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी सव्वा लाख बचतगटातील सखींना ड्रोनद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.