महिंदळे ग्रामपंचायतीच्या पिण्याचे पाणी खराब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2017 11:30 PM2017-02-15T23:30:19+5:302017-02-15T23:30:19+5:30
जि.प.तर्फे रेड कार्ड : पहिल्या वार्षिक तपासणीच्या अहवालात ताशेरे
जळगाव : महिंदळे ता.भडगाव येथील ग्रामस्थांना सुमार दर्जाचे पाणी पिण्यास मिळत आहे. याकडे मागील सहा महिने ग्रा.पं.ने दुर्लक्ष केले. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका असल्याचा अहवाल जि.प.च्या आरोग्य विभागाने सव्रेक्षणाअंती प्रसिद्ध केला आहे. जिल्हाभरातील ग्रा.पं.अंतर्गत असलेल्या नळ योजना, सार्वजनिक पाणीपुरवठय़ाचे स्त्रोत असलेल्या विहिरी, कूपनलिका याबाबत स्वच्छता सव्रेक्षणानंतर हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
वर्षातून दोनदा स्वच्छता सव्रेक्षण केले जाते. त्यासाठी जि.प.च्या आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आरोग्य सेवक गावांमध्ये पाहणी करतात. कूपनलिकेसाठी गुलाबी, विहिरींसाठी पांढरा व नळ योजनांसाठी राखाडी रंगाची प्रश्नावली आरोग्यसेवकातर्फे भरली जाते.
धोकादायक स्थितीसाठी रेड कार्ड
ज्या गावात पिण्याच्या पाण्याचे नमुने मागील सहा महिने खराब आले.. त्यात सुधारणांसाठी कुठलेही प्रयत्न झाले नाहीत.., टिसीएलचा अभाव.., अशा अनेक कारणांसाठी ग्रा.पं.ना रेड कार्ड दिले जाते. त्यात जिल्हाभरातील 1151 ग्रा.पं.पैकी महिंदळे ग्रा.पं.ला रेड कार्ड जि.प.च्या आरोग्य विभागाने दाखविले आहे.
सुधारणेसंबंधी ही अंतिम सूचना असून, यापुढे संबंधित गावात पिण्याच्या पाण्याने साथरोग पसरला.. काही अनुचित घटना घडली तर त्यास ग्रा.पं. पूर्णत: जबाबदार राहणार आहे.
84 गावांना पिवळे कार्ड
जिल्हाभरातील 84 गावांमध्येही पिण्याच्या पाण्याचे नमुने खराब आले आहेत. या गावांमधील स्थिती मात्र धोक्याच्या पातळीर्पयत नाही. संबंधित गावांना पिवळे कार्ड दाखविण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक 11 चाळीसगाव तालुक्यातील ग्रा.पं.ना पिवळे कार्ड देण्यात आले आहे. महिनाभरात संबंधित गावांमध्ये पाणीपुरवठय़ाबाबत सुधारणा कराव्या लागणार आहेत.
1065 गावांमध्ये चांगली स्थिती
जिल्हाभरातील 1065 गावांमध्ये पिण्याच्या पुरवठय़ाबाबत स्थिती चांगली आहे. ग्रामस्थांना चांगले पाणी मिळते, असा अहवालही वार्षिक तपासणी कार्यक्रमातील पहिल्या सव्रेक्षणातून आला आहे.
या गावांना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. हिरवे कार्ड दिलेल्या ग्रा.पं.ची तालुकानिहाय संख्या - अमळनेर 111, भडगाव 38, भुसावळ 39, बोदवड 39, चोपडा 85, चाळीसगाव 96, धरणगाव 71, एरंडोल 46, जामनेर 99, जळगाव 64, मुक्ताईनगर 53, पाचोरा 92, पारोळा 80, रावेर 88, यावल 64.
संबधित गावाच्या ग्रामपंचायतींनी तत्काळ उपाययोजना करून ग्रामस्थांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे असे निर्देश देण्यात आले आहे.
पिण्याच्या पाण्याबाबत खराब असलेल्या गावांना रेडे कार्ड दिले. या गावातील पिण्याच्या पाण्याचे नुमने मागील सहा महिन्यांपासून खराब आले आहेत. या गावात तातडीने उपाययोजना करून सुधारणा अपेक्षित आहे. त्याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना पत्र दिले आहे.
-बी.आर.पाटील, प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी