सातपुड्यात दरवळला महू फुलांचा सुगंध
By admin | Published: March 19, 2017 12:44 AM2017-03-19T00:44:44+5:302017-03-19T00:44:44+5:30
हंगामाला सुरुवात : प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त, अनेकांना मिळाला रोजगार
कोठार : सातपुडा पर्वतरांगेत महूच्या हंगामास सुरुवात झाली असून, सध्या सातपुड्याच्या पर्वतरांगा व पायथ्याशी महूच्या फुलांचा सुगंध दरवळू लागला आहे.
आयुर्वेदात महत्त्वाच्या समजल्या जाणाºया महूच्या फुलांचे सातपुडा पर्वतरांगेत मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. या भागातील स्थानिक आदिवासींच्या मालकीची असणारी शेकडो महूच्या फुलांची झाडे सातपुड्याच्या पंचक्रोशीत आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीला संक्रमणाच्या काळात महूच्या झाडांना फुलांचा बहर येतो. दरवर्षी ही महूची फुले स्थानिक आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात हंगामी स्वरूपाचा रोजगार उपलब्ध करून देतात.
यावर्षीही सातपुड्याच्या पंचक्रोशीतील महूच्या झाडांच्या फुलांचा चांगला बहर आला असून, महूच्या फुलांचे संकलन करताना स्थानिक दिसून येत आहे. संकलित केलेली महूची फुले वाळीत घालून त्यापासून मद्यनिर्मिती केली जाते. आदिवासी समाजामध्ये विशेषत: सातपुड्यातील जमातीमध्ये महूपासून तयार केलेल्या मद्याला खूप महत्त्व असते. लग्न समारंभामध्ये येणाºया पाहुण्यांचा आदरातिथ्य महूपासून निर्मित मद्याने केला जातो. त्याला खूप मानाचे स्थान असते. येणाºया काळात लग्न समारंभ असणाºया घरातील सदस्य जाणीवपूर्वक त्यासाठी महू फुलांचे संकलन करताना पाहायला मिळत आहेत. तर अनेक जण संकलित केलेली महूची फुले बाजारात विक्री करून पैसे कमवित आहेत. ओल्या असणाºया महू फुलांना साधारणत: ४० ते ५० रुपये किलो तर वाळलेल्या महूच्या फुलांना ५० ते ७० रुपये किलो याप्रमाणे भाव मिळतो.
धडगाव, तळोदा, अक्कलकुवा व मोलगीच्या बाजारात महूच्या फुलांना चांगली मागणी असते.
महूच्या फुलांपासून तयार होणारे मद्य जीर्ण खोकल्यावर प्रभावी औषध असून, महूची फुले ही शरीराच्या रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच पोटदुखी, कृमीजन्य विकार, खोकला यावर गुणकारी आहेत. त्यामुळे महूच्या फुलांची उसळ करून खाल्ली जाते. शिवाय महूच्या फुलांचीदेखील आयुर्वेदिकदृष्ट्या उपयुक्त असते. सांधेदुखी व मुक्या माराच्या ठिकाणी महूची फुले गरम करून लावल्यास आराम पडतो.
यंदाच्या वर्षी बहराच्या हंगामात हवामानातील बदलामुळे महू फुलांवर प्रतिकूल परिणाम होऊन दरवर्षीपेक्षा यंदा येणारा बहर हा कमी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यासाठी कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्यात यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या १० वर्षांपूर्वी हजारोंच्या पटीने असणारी महूच्या झाडांची संख्या शेकडोंवर आली आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगेत होणारी अवैध वृक्षतोड ही यामागील मुख्य कारण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या परिसरात महूच्या वृक्षांचे संवर्धन करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, याठिकाणी व्यक्तिगत मालकीची झाडे शिल्लक राहिली आहेत.
(वार्ताहर)
महूवर प्रक्रिया करणारे उद्योग हवे
दरवर्षी बहरणारी महूची झाडे आपल्या बहारासोबतच स्थानिकांसाठी हंगामी रोजगार घेऊन येतात. शेताच्या बांधावर अनेक महिला-पुरुषांबरोबर शालेय विद्यार्थी महू फुलांची वेचणी करताना दिसून येतात. या महू फुलांच्या विक्रीतून त्यांना आर्थिक फायदा होत असतो.
महू फुलांच्या हंगामात या फुलांवरील प्रक्रियेबाबतच्या चर्चेत भर पडत असते. परंतु इतर कालावधीत त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत असते. या फुलांवर प्रक्रिया करणारे उद्योग जर सातपुड्यात उभारण्यात आले तर मोठ्या प्रमाणात या परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तसेच महूपासून तयार करण्यात येणाºया उत्पादनास राष्टÑीय, आंतरराष्टÑीय स्तरावर पोहोचविल्यास महू उत्पादकांना मोठा फायदा होऊ शकतो. परंतु त्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.