कामांची दर्जा व गुणवत्ता राखा, पालकमंत्र्यांच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:16 AM2021-01-22T04:16:27+5:302021-01-22T04:16:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून करण्यात येणारी कामे ही जिल्ह्याच्या विकासात भर घालणारी ठरावी, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून करण्यात येणारी कामे ही जिल्ह्याच्या विकासात भर घालणारी ठरावी, याकरिता प्रत्येक विभागामार्फत करण्यात येणारे काम दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.
जिल्हा वार्षिक योजना खर्च आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रताप पाटील, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरीता शिक्षण, आरोग्य, सिंचन, विजेबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य दिले जावे. याकरिता पोलीस विभागाला १ कोटी ५३ लाख रुपयांची तरतूद करण्यात यावी. यामधून पोलीस विभागास २० नवीन वाहने खरेदीचा प्रस्ताव सादर करावा.
सर्व संबंधित विभागांनी कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठीचे प्रस्ताव तातडीने सादर करावे, अपूर्ण कामे वेळेत पूर्ण होतील याचे नियोजन करतानाच यावर्षी कामांची निवड करताना विकासात्मक कामांची निवड करण्याची सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली.
कोविडच्या खर्चाला मान्यता
जिल्हा वार्षिक योजनेतून आतापर्यंत कोविडच्या उपाययोजनांसाठी ६१.८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ४८.४४ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तर २६.७० कोटी रुपयांचा निधी संबंधित यंत्रणांना वितरित करण्यात आला आहे. त्याचबरोबर २०२०-२१ मध्ये जिल्ह्याला सर्वसाधारण, अनुसूचित जाती, जमाती उपयोजनांसाठी ५१३ कोटी ४३ लाख रुपयांचा नियतव्यव मंजूर असून अर्थसंकल्पित तरतूद करण्यात आली आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यास याप्रमाणे निधी बीडीएसवर प्राप्त झाला आहे. तर ५०.२६ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडून वितरित करण्यात आला असून ४१.१८ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रताप पाटील यांनी बैठकीत दिली.