मका उत्पादक शेतकऱ्यांना शासनाचा पुन्हा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:16 AM2020-12-22T04:16:31+5:302020-12-22T04:16:31+5:30

पीक - नोंदणी - विक्री केलेले शेतकरी - खरेदी - राज्याचे उद्दिष्ट ज्वारी - ५ हजार ९५ - ...

Maize growers are again targeted by the government | मका उत्पादक शेतकऱ्यांना शासनाचा पुन्हा ठेंगा

मका उत्पादक शेतकऱ्यांना शासनाचा पुन्हा ठेंगा

Next

पीक - नोंदणी - विक्री केलेले शेतकरी - खरेदी - राज्याचे उद्दिष्ट

ज्वारी - ५ हजार ९५ - १ हजार ५९२ - ३४ हजार २४८ क्विंटल - १ लाख क्विंटल

मका - ५ हजार ६०६ - १ हजार २९४ - ५२ हजार ६८० - ४ लाख ९० हजार क्विंटल

बाजरी - ६४८ - ५८ - ६७९ क्विंटल - ९ हजार ५०० क्विंटल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा मार्केटिंगच्या वतीने मका खरेदीला सुरुवात झाली होती. मात्र, पंधरा दिवसांतच शासनाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत मका खरेदी थांबविण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात ५ हजार ६०६ शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती.

त्यापैकी केवळ १ हजार २९४ शेतकऱ्यांकडून मक्याची खरेदी करण्यात आली. रब्बीच्या मका खरेदीवेळी देखील शासनाने अचानक खरेदी थांबविल्याने तब्बल १६ हजार शेतकऱ्यांना आपला माल मातीमोल किमतीत व्यापाऱ्यांना विक्री करावा लागला होता. शासनाने पुन्हा मका खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

जिल्ह्यात रब्बीप्रमाणेच पावसाळी मकादेखील मोठ्या प्रमाणात घेतला जातो. खरीप क्षेत्रात मक्याची सुमारे २७ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. इतर पिकांच्या तुलनेत यंदा मक्याचे उत्पन्न चांगले आहे. शासनाने मक्याची खरेदी उशिरानेच सुरु केली. मात्र, उशिराने खरेदी सुरू केल्यानंतर ही खरेदी अजून काही दिवस सुरू ठेवण्याची गरज असताना केवळ पंधरा दिवसांतच खरेदी थांबवली आहे.

त्यामुळे नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनी आपला माल विक्री करावा तरी कोठे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संथगतीने करण्यात आली खरेदी

शासनाने ४ लाख क्विंटलचे उद्दिष्ट दिल्यानंतर जिल्हा मार्केटिंगने आपली खरेदीची गती वेगात ठेवणे अपेक्षित होते. मात्र, पंधरा दिवसांत नोंदणी झालेल्या ५ हजार ६०६ शेतकऱ्यांपैकी केवळ १ हजार २९४ शेतकऱ्यांकडूनच मका खरेदी करण्यात आला. त्यामुळे उर्वरित ४ हजार ३१२ शेतकऱ्यांनी माल विक्री करण्यासाठी नाइलाजास्तव व्यापाऱ्यांकडेच पाय घासावे लागणार आहेत. तसेच हमीभाव देखील मिळणे कठिण आहे. जिल्हा मार्केटिंगकडून जुलै महिन्यात देखील संथगतीने खरेदी केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता.

बाजरीचीही खरेदी थांबली

मक्याप्रमाणेच बाजरीची खरेदी थांबली आहे. बाजरी विक्रीसाठी जिल्ह्यातील ६४८ शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती. मात्र, त्यापैकी केवळ ५८ शेतकऱ्यांकडून ६७९ क्विंटल बाजरीची खरेदी झाली. मात्र, ५९० शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्यात आलेला नाही. दरम्यान, नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे. मका व बाजरीची खरेदी थांबली असली तरी ज्वारीची खरेदी सुरू आहे. ज्वारीसाठी जिल्ह्यात ५ हजार ९५ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. अद्यापपर्यंत १ हजार ५९२ शेतकऱ्यांनी आपला माल विक्री केला आहे. राज्य शासनाने १ लाख क्विंटलचे उद्दिष्ट असून, अजून दोन ते तीन दिवस ज्वारीची खरेदी सुरू राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Maize growers are again targeted by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.