मका खरेदी पुन्हा सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:13 AM2021-01-09T04:13:33+5:302021-01-09T04:13:33+5:30
जळगाव : केंद्र सरकारने राज्यात मका खरेदीचे उद्दिष्ठ पुर्ण झाल्याने मका खरेदी बंद केली ...
जळगाव : केंद्र सरकारने राज्यात मका खरेदीचे उद्दिष्ठ पुर्ण झाल्याने मका खरेदी बंद केली होती. त्याचे आदेश १८ डिसेंबरला काढले होते. मात्र त्यानंतर खासदार रक्षा खडसे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना केंद्र सरकारला पुन्हा पत्र देण्याची विनंती केली होती. त्यानुसार राज्य शासनाने पत्र पाठवल्यावर मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
खुल्या बाजारात हमी भावाच्या तुलनेत प्रति क्विटल ५०० ते ६०० रुपयांचे नुकसान शेतकऱ्याला सहन करावे लागत होते. त्यामुळे मका खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. मका खरेदीबाबत काही शेतकऱ्यांची शासनच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती. मात्र त्यांच्या मक्याची शासनाकडून खरेदी झालेली नव्हती. त्याबाबत ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरण केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी खासदार रक्षा खडसे यांनी पत्रव्यवहार केला. त्यावेळी राज्य सरकारने मका खरेदीला मुदतवाढ मिळण्यासाठी केंद्राकडे प्रस्तावच सादर केलेला नसल्याचे कळवण्यात आले.
राज्य सरकारने तसा प्रस्ताव त्यांच्याकडून आल्यास मका खरेदीसाठी आणखी मुदतवाढ देण्यास केंद्र सरकार तयार आहे, असे आश्वासन दानवे यांनी खासदार खडसे यांना दिलेले होते. राज्य सरकार कडून तात्काळ केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याचे संबंधितांना आदेश देण्यात यावे, अशी विनंती खासदार रक्षा खडसे यांनी मंत्री छगन भुजबळ केली होती. त्यानुसार प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्याला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. पुढच्या आठवड्यात मका खरेदीकेंद्रे सुरू होणार आहे.